कोळकी : शासनाने मंजूर केलेले विडणीतील कृषी मंडल कार्यालय नावाला असून, त्याचे कामकाज फलटणमधून चालते. त्यामुळे बळीराजाची सोय होण्याऐवजी गैरसोयच जास्त होत आहे. ते पूर्ववत विडणीत सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.
फलटण तालुक्यातील सर्वात मोठे विडणी असून सर्व क्षेत्र बागायत पट्ट्यात असल्याने येथे कृषी मंडल कार्यालयास शासनाने विडणी येथे मंजुरी दिली. या मंडल कार्यालयात मंडल अधिकारी, दोन निरीक्षक आणि कृषिसेवक शिपाई असे पंधरा कर्मचारी संख्या असते. या मंडल कार्यालयअंतर्गत परिसरातील पंधरा वीस गावे येतात. परंतु विडणीचे कृषी मंडल कार्यालय ग्रामस्थांना स्थलांतरबाबत कोणतीही सूचना न देताच फलटणला आणण्यात आले. मंडल कार्यालयामुळे शेतकऱ्यांना अधिकारी भेटत होते. मार्गदर्शन शासकीय योजनाची माहिती मिळत होती. मंडल कार्यालय स्थलांतर केल्यामुळे कृषी विभागाचे अधिकारी कधी येतात कधी जातात याची लोकांना माहिती मिळत नाही. संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल संपर्कक्षेत्राच्या बाहेर असतो.
विडणी येथे कृषी मंडल कार्यालय विडणीतील व परिसरातील शेतकऱ्याच्या सोईसाठी सुरु केले होते. परंतु कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोईसाठी मंडल कार्यालय स्थलांतर करून फलटण येथे आणून अधिकारी वर्ग फलटणमध्ये बसून कागदी घोडे रंगवून कामकाज चालले आहे. मंडल कार्यालयासाठी विडणी ग्रामपंचायत जागा उपलब्ध करुन दिली जाईल, असेही सरपंच रुपाली अभंग यांनी सांगितले आहे. त्यामुळे ते जागेवरच सुरू करणे गरजेचे आहे.
चौकट
शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांची भेट होईना
फळबागासाठी शासन कृषी विभागाच्या माध्यमातून रोपे, अनुदान येत असते. शेतीसाठी औजारे अनुदानावर येत असतात. परंतु याचा लाभ मोठमोठे बागायतदार शेतकरी कृषी अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून लाभ घेत असतात. परंतु सर्वसामान्य शेतकरी वर्गास याची माहिती भेटत नसल्याने तो या लाभापासून वंचित राहत असतो.
कृषी विभागाचे फलटण तालुक्यात फलटण, बरड, तरडगाव, विडणी असे चार मंडल कार्यालय असताना सर्व ठिकाणी मंडल कार्यालय सुरु आहेत. मग विडणीतील मंडल कार्यालय स्थंलातर करायचे कारण काय? असा शेतकरी वर्गातून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रतिक्रिया
विडणीतून दहा-बारा वर्षांपासून कृषी मंडल कार्यालय फलटणला स्थलांतर केले असल्याने यांची शेतकरी वर्गाला कल्पना नाही. अनेक शेतकरी विडणी गावासाठी कृषी मंडल कार्यालय आहे हे अद्याप माहिती नाही. कृषी मंडल कार्यालयामुळे शेतकरी व अधिकाऱ्यांचा दैनंदिन संपर्क राहतो. मार्गदर्शन मिळते. त्यामुळे मंडल कार्यालय विडणीतूनच सुरू करावे.
- दादासाहेब नाळे
प्रगतशील शेतकरी.
विडणीतील कृषी मंडल कार्यालय जागेअभावी फलटणमध्ये स्थलांतर केले होते. जागा उपलब्ध करून दिल्यास विडणीत कृषि मंडल कार्यालय सुरु केले जाईल. - सुहास रणसिंग
प्रभारी तालुका कृषि अधिकारी.