सातारा : कोराेनाच्या गतवर्षाच्या उद्रेकानंतर शहरातील रस्त्यावर अन् गल्लोगल्ली पानटपऱ्या रातोरात ठेवल्या गेल्या. बेरोजगारांनी रोजीरोटीसाठी व्यवसायाचा आधार घेतला म्हणून या पानटपऱ्यांकडे पोलिसांबरोबरच पालिकेेनेही कानाडोळा केला. पण हा कानाडोळा आता वेगळ्या वळणावर जाऊन ठेपला असून, व्यवसायाचं नाव पानटपरी असलं तर त्याच्या आडोशाला मात्र मटका व्यवसाय सुरू असल्याचे शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय.
सातारा शहरामध्ये गत पाच वर्षांपूर्वी काही ठरावीक ठिकाणीच मटक्याचे अड्डे होते. त्यामुळे पोलिसांना छापा टाकणे सोपे जात होते. मात्र, गत वर्षभरापासून मटक्याचे अड्डे चारपटीने वाढले. जुन्या मटका व्यावसायिकांनी आपापल्या व्यवसायाची विभागणी करून पोट व्यावसायिक निर्माण केले. त्यामुळे शहरात सध्या बहुतांश पानटपरीच्या आडोशाने मटका व्यवसाय बोकाळल्याचे पहायला मिळत आहे. विशेषत: कोरोनाच्या शिरकावानंतर या पानटपऱ्या एखाद्या भुईचक्रासारख्या वाढल्या. अनेकांना वाटलं. बेरोजगार युवक पुढे येऊन काही तरी व्यवसाय करत आहेत. त्यामुळे त्यांचे काैतुकही झालं. यामध्ये अनेक व्यावसायिक असे आहेत की ते प्रामाणिक आपला व्यवसाय करत आहेत. मात्र, त्यापेक्षा पानटपरीच्या आडोशानं मटका व्यवसायात उतरलेल्या युवकांची संख्या अधिकच आहे.
पोलिसांकडून एकदिवसाआड कारवाई होत आहेच. परंतु तरीसुद्धा शहरातील मटका व्यवसाय पूर्णपणे बंद होत नाही. केवळ कारवाई झाल्यानंतर दोन ते तीन दिवस हा मटका व्यवसाय बंद होतो. पण पुन्हा त्याच जोमाने सुरू होतो. कारवाई करूनसुद्धा हे व्यवसाय पुन्हा सुरू होत असल्याने याचे कोडे काही सर्वसामान्य नागरिकांना उलगडत नाही. महिन्यात १८ ठिकाणी पोलिसांनी मटका अड्ड्यावर छापे टाकले आहेत. यातील सर्व ठिकाणे ही पानटपरीचा आडोसाच होती. शहरातील राजवाडा, समर्थ मंदिर, मोळाचा ओढा, शाहूपुरी, पोवई नाका, बसस्थानक, भूविकास बॅंक चाैक, विसावा नाका आदी परिसरातील पानटपऱ्या पोलिसांनी तपासणे गरजेचे आहे.
चाैकट :
..म्हणे अटकेची तरतूद नाही!
मटका खेळताना किंवा घेताना कोणी पोलिसांच्या तावडीत सापडला तर त्याला ताब्यात घेतले जाते. त्यानंतर त्याला नोटीस बजावून सोडून दिले जाते. म्हणे कायद्यात अटक करण्याची तरतूद नसते. त्यामुळे या मटका व्यवसायावर कितीही वेळा कारवाई केली तरी पुन्हा हे व्यवसाय सुरूच राहातात. फार फार तर अशा लोकांवर सहा महिने ते एक वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई होते.