सातारा : बळीराजाला मदत होण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत वर्षाला शेतकऱ्याला सहा हजार रुपये मिळतात. त्याप्रमाणेच राज्य शासनानेही नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली असून याचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील ४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ८० कोटी रुपये जमा होणार आहेत. तर केंद्राचाही दुसरा हप्ता मिळू शकते. त्यामुळे बळीराजा मालामाल होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. या अंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्यात येतात. हे पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होत असतात. आतापर्यंत शेतकऱ्यांना १४ हप्ते देण्यात आलेले आहेत. यातून शेतकरी शेतीपयोगी साहित्य, खते आणि बियाणे खरेदी करत असतो. त्याचबरोबर राज्य शासनानेही शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केलेली आहे. या योजनेवर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झालेले आहे.त्यातच ‘नमो’ योजनेचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होऊ शकतात. यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर सुमारे ८० कोटी येऊ शकतात. त्याचबरोबर केंद्र शासनाने या योजने अंतर्गत २०२३-२४ वर्षातील पहिला हप्ता दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांना दिलेला आहे. आता दुसरा हप्ताही लवकरच मिळणार आहे. दिवाळीच्यावेळीच हा निधी जमा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.
जिल्ह्यात साडेचार लाख लाभार्थी...केंद्र शासनाने ही योजना सुरू केली तेव्हा जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक शेतकरी लाभाऱ्थी होते. मात्र, त्यानंतर आयकर भरणारे, नोकरदार यांना वगळण्यात आले. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४७ हजार ६५५ शेतकरी लाभाऱ्थी राहिले होते. त्यातील ४ लाख ८ हजार ४३४ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली होती.