सातारा : शून्यातून विश्व निर्माण करणारे उद्योजक नानासाहेब कदम यांचे कार्य कधीच न विसरता येणारे आहे. त्यांनी केलेले कष्ट, त्यांचा कामकाजाचा आवाका, जनसंपर्क यामुळेच त्यांनी उद्योग क्षेत्रात वेगळी उंची गाठली. त्यांचे कार्य हे सदैव स्मरणात राहील, असे उद्गार सचिन बेलागडे यांनी काढले.
मद्य विक्रेता असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब कदम यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना असोसिएशनच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. नानासाहेब कदम यांनी प्रारंभी अपार कष्ट केले. जीवनात अनेक संकटे आली मात्र ते डगमगले नाहीत. जे चटके सहन केले ते दुसऱ्याच्या वाट्याला कधीच येऊ नये, यासाठी ते आयुष्यभर झटत राहिले. आज त्यांच्यामुळेच सातारा जिल्हा मद्य विक्रेता असोसिएशन भक्कमपणे उभी आहे.
सातारा जिल्ह्याची गेली सोळा वर्षे बंद पडलेली सातारा जिल्हा लिकर असोसिएशन नानासाहेब कदम यांनी सचिन बेलागडे, बाळासाहेब बाचल, आर.टी. स्वामी, बबनराव शिंदे यांच्या मदतीने पुन्हा उभी केली आणि ती अत्यंत सक्षमपणे चालविली. जिल्ह्यातील लिकर व्यावसायिकांना ही संघटना आधारस्तंभ वाटते. नानासाहेब कदम यांनी या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांची उणीव कायम राहणार आहे, असे मतही सचिन बेलागडे यांनी व्यक्त केले. (वा.प्र.)