औंध : खटाव तालुक्यातील नांदोशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत कौलारू असून, ती पूर्णपणे गळकी आहे. पावसामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच खटाव पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे व गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी शाळेची पाहणी करून छत दुरुस्तीसाठी दीड लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली.
नांदोशी ग्रामस्थांनी चारवेळा छत दुरुस्तीसाठी प्रस्ताव दिला होता; परंतु त्यास यश मिळाले नव्हते. पावसामुळे वर्गात पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अखेर शाळेची दुरवस्था व ग्रामस्थ तसेच पालकांच्या भावना ‘लोकमत’च्या माध्यमातून मांडल्या गेल्या. या वृत्ताची प्रशासनाच्या वतीने तातडीने दखल घेण्यात आली.सभापती संदीप मांडवे यांच्या गणातील हे गाव असून त्यांनी स्वत:, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, विस्तार अधिकारी सुजाता घाडगे यांच्या समवेत वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यानंतर दुरुस्तीच्या कामासाठी निधी मिळावा, यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात आली.पालक, ग्रामस्थांमधून समाधानया शाळेच्या छत दुरुस्तीसाठी दीड लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नांदोशीशाळेतील विद्यार्थ्यांना इमारतीच्या छताची दुरुस्ती झाल्यानंतर मोठा दिलासा मिळणार आहे. दुरुस्तीची कामे लवकरच सुरू होणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून समस्येच्या गर्तेत अडकलेल्या या शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याने पालक व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नांदोशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सभापती संदीप मांडवे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, सुजाता घाडगे यांच्यासह अधिकाºयांनी पाहणी केली.
नांदोशी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दुरवस्थेची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. शाळेच्या छत दुरुस्तीबरोबर आणखी काही भौतिक सुविधा देता येतील, यासाठी प्रयत्नशील आहे.- संदीप मांडवे, सभापतीपंचायत समिती खटाव