ढेबेवाडी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मात्र, त्यांना ते शक्य होत नसल्याने त्यांनी शिवसेना तोडली. मोदी आणि शाह हेच खरे मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत,’ असा घणाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. राज्यातील सत्ता संघर्षाचा केंद्रबिंदू पाटण आणि सातारा हाच आहे, येथील गद्दारांनी राज्याची बदनामी केली, ही बदनामी धुवून काढण्यासाठी गद्दारीचे बीज उखडून टाकण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.गुढे, ता. पाटण येथील कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार राऊत यांनी सत्ताधाऱ्यांसह भारतीय जनता पक्षावरही जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख हर्षद कदम, तालुकाप्रमुख सचिन आचरे, उपजिल्हाप्रमुख रवींद्र पाटील, प्रवीण शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले, ‘मुंबईत मराठी माणसाला सन्मानाने जगता यावे, यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेना ही आग आहे, ती कुणालाही विझविता येणार नाही. याच शिवसेनेने महाराष्ट्राला आणि मुंबईला वाचवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या या मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. मात्र, जोपर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत हा प्रयत्न यशस्वी होणार नाही म्हणूनच शिवसेना तोडण्याचे पाप मोदी आणि शाह यांनी केले.चाळीस गद्दारांना घेऊन निर्माण झालेले हे महाराष्ट्रातील सरकार दोनच महिन्यांत कोसळणार आहे. या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण आणि सातारा हाच आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले, त्यांच्याच वारसदाराने गद्दारीची बीजे पेरून महाराष्ट्राची बदनामी केली. ही बीजे उखडून पाटणमध्ये भगवा फडकला, असे आवाहनही त्यांनी केले. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी कितीही सभा घेतल्या तरीही कर्नाटकची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे. २०२४ मध्ये केंद्रामध्ये नरेंद्र आणि राज्यांमध्ये देवेंद्र दिसणार नाहीत. प्रा. नितीन बानुगडे-पाटील, तालुकाप्रमुख सुरेश पाटील, जिल्हा प्रमुख हर्षद कदम आदींची भाषणे झाली. सचिन काळभोर यांनी प्रास्ताविक केले. सचिन आचरे यांनी स्वागत केले. दादासाहेब नलवडे यांनी आभार मानले.
मी पुन्हा येईन; पण फौजदाराचा शिपाई बनून नव्हे..
या तालुक्यात मी पुन्हा येईन; पण देवेंद्रासारखा नव्हे, फौजदाराचा शिपाई बनून तर या तालुक्यावर पुन्हा भगवा फडकलेला पाहण्यासाठी, असे खासदार राऊत म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
लोकनेते खऱ्या अर्थानं लोकनेते होते; पण...लोकनेते खऱ्या अर्थानं लोकनेते होते; पण त्यांच्या घराण्यात गद्दारीची घाण कुठून आली. राज्याच्या गद्दारीचा केंद्रबिंदूच पाटण असल्याने तो आता उखडून टाकायला हवा.