सातारा : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जी राष्ट्रीय एकात्मता व भाईचारा होता, तो धुळीस मिळविण्याचा कार्यक्रम केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारने हाती घेतला आहे. याच्याविरोधात आता सर्वांनीच एल्गार पुकारला पाहिजे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार वृंदा करात यांनी सातारा येथील गांधी मैदानावरील जाहीर सभेत बोलताना केले.ऐतिहासिक सातारा शहरातील महात्मा गांधी मैदानावर काल, शुक्रवारी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्यावतीने ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी जनवादीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा कॉम्रेड नसीमा शेख होत्या.यावेळी विचार मंचावर ज्येष्ठ नेत्या कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, उदय नारकर, कॉ. सुधा सुंदरामन, शुभा शमीम, प्राची हातिवलेकर, मरियम ढवळे, किरण माने, माणिक अवघडे, आनंदी अवघडे आदी उपस्थित होते. यावेळी सातारकर उपस्थित होते.करात म्हणाल्या, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास बदलण्याचे काम करीत आहेत, हे आपल्याला जनतेपुढे आणायचे आहे. जो एकात्मतेचा विचार घेऊन स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्य पत्करले, ते हौतात्म्य आम्ही वाया जाऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.स्वातंत्र्ययुद्ध सुरू होते, तेव्हा मोदीजी यांच्या विचारांचे अनुयायी कुठे होते, असा सवालही उपस्थित केला. देशाच्या संविधानावर घाला घालण्याचे काम मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार करत असल्याचा आरोप करून, संविधान बदलण्याचे कारस्थान आम्ही हाणून पाडू, असा इशाराही त्यांनी दिला. देशात महागाई वाढली आहे, परंतु पंतप्रधान मोदी व त्यांच्या समर्थकांना त्याची काळजी नाही, तर त्यांना हनुमान चालिसा वाचण्याची काळजी आहे.यावेळी कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर, शुभा शमीम, मरियम ढवळे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक जनवादीच्या जिल्हा चिटणीस आनंदी अवघडे यांनी केले, सूत्रसंचालन प्राची हातिवलेकर यांनी केले.
Brinda Karat: एकात्मता धुळीस मिळविण्याचा मोदींचा डाव, वृंदा करातांचा केंद्र सरकारवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 5:23 PM