सातारा : येथील सैनिक स्कूलमध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा स्कूलमधील पोहण्याच्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.कुणाल कृष्णा वाणी (वय १७, रा. नाशीक) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुणाल हा सैनिक स्कूलमध्ये असलेल्या प्रवेश परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर सहावीपासून तो सैनिक स्कूलमध्ये शिकत होता. सध्या तो बारावीमध्ये शिकत होता.
बारावीची परीक्षा सुरू असल्यामुळे शनिवारी त्याचे वडील कृष्णा वाणी हे त्याला भेटून गेले होते. त्याच्या भावाने रविवारी दुपारी दीडच्या सुमारास त्याला फोन केला होता. या वेळी त्याने सर्व काही ठिक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच ही दुर्देवी घटना घडली.सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पोहण्यासाठी तलाव आहे. काही मुले रविवारी सुटी असल्याने पोहण्यासाठी तलावामध्ये उतरली होती. त्यामध्ये कुणालही होता. पोहत असताना कुणाल अचानक बुडाला. हा प्रकार त्याच्यासोबत असलेल्या मुलांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ कुणालला तलावून बाहेर काढले. त्याच्या नाका तोंडामध्ये पाणी गेल्यामुळे तो बेशुद्ध पडला होता.याची माहिती सैनिक स्कूलच्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी कुणालला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषीत केले. सैनिक स्कूलच्या कर्मचाºयांनी या घटनेची माहिती कुणालच्या वडिलांना दिली.कुणालचा भाऊ पुण्यामधील एका महाविद्यालयात शिकत आहे. वडिलांनी त्याला सैनिक स्कूलमध्ये कुणाल बुडाल्याची माहिती फोनवर दिल्यानंतर तो त्याच्या काही मित्रांसोबत साताऱ्यात आला. कुणालचे कुटुंबीयही नाशिकहून साताऱ्याकडे येण्यासाठी निघाले आहेत. कुणालबाबत नेमकी काय घटना घडली याबाबतची माहिती सैनिक स्कूलमधील प्रशासनाकडून देण्यात आली नाही. शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.कुरूण येथे विहिरीत बुडून महिलेचा मृत्यूसातारा : कुरूण, ता. सातारा येथे विहिरीत बुडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.लता बबन पवार (वय ४५, रा. कुरूण, ता. सातारा) असे बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कुरूण गावातील टेकाची विहीर परिसरात रविवारी दुपारी लता या गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पाय घसरल्याने त्या विहिरीत पडल्या. त्यांनी जीव वाचविण्यासाठी आरडाओरड केली. मात्र, त्या परिसरात लोकांची वर्दळ नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हवालदार दीपक बर्गे हे अधिक तपास करत आहेत.