सातारा : पुणे येथील ‘नडनम’ या नृत्य संस्थेच्या गुरू केतकी काळे यांच्यासह वीस शिष्यांच्या विविध सात नृत्य शैली प्रकारातील बहारदार नृत्यांनी नटराज संगीत-नृत्य महोत्सवातला चौथा दिवस गाजवला. ही नृत्ये सादर होताना कलाशिक्षिका दीपिका शिंगटे यांनी नृत्य करणाऱ्या नटराजाचे चित्र रेखाटत एक अनोखा अविष्कार साकारला. नृत्य कार्यक्रमाची सुरुवात कलाकारांनी गणेश वंदनाने केली. यानंतर ‘जोग’ रागातील आदितालातील पुष्पांजली साकारत नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर नृत्याची देवता अर्थात नटराजाचे कौतुक करणारी ‘नटेश कौत्वम’ या रचनेवर नृत्य सादर झाले.‘नृत्य संचित’ ही नृत्य नाटिका सादर करताना नाट्यशास्त्रावर आधारित तब्बल चार भाषेतील हे नाट्य सादर झाले. त्यानंतर नवरस पूर्ण अशा शास्त्रीय व लोकनृत्यामध्ये देशात सादर होणारे कुचीपडी, ओडीसी, मणीपुरी, कथकली, कथ्थक, मोहिनी अट्टम आणि भरतनाट्यम् हे सात विविध नृत्य प्रकार अतिशय सुरेखपणे सादर केले गेले. देशातील काश्मिरी नृत्य, गुजरात मधील गरबा, दांडिया व महाराष्ट्रातील जागरण, गोंधळ सादर करून या नृत्याविष्काराची सांगता झाली. कार्यक्रमाचे नेत्रा जोशी यांनी सूत्रसंचलन केले. नृत्यामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थितहोते. (प्रतिनिधी)
नटराज महोत्सव : जागरण, गोंधळ नृत्याविष्काराची सांगता
By admin | Published: February 13, 2015 12:02 AM