वडूज : राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून इकोब्रिक्स तयार करणे हा विज्ञानदर्शी उपक्रम राबविला. पृथ्वी वाचविण्यासाठी प्रयासचा खऱ्या अर्थाने प्रयासच म्हणावा लागेल. खरंतर प्रत्येक नागरिकाने याचा विचार करून कृती करणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थ्यांना भविष्यकाळात पर्यावरणीय संकटापासून भावी पिढी व स्वतःला वाचवायचे असेल तर आतापासूनच सुरुवात करायला पाहिजे.
माती, जल व वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. प्लास्टिकचा वापर कमी होत नाही. कमीत कमी वापर, पुन्हा-पुन्हा वापर, एखादी वस्तू वापरून झाल्यावर त्यावर प्रक्रिया करणे. शालेय विद्यार्थ्यांना सवय लावण्यासाठी असे कृतिशील उपक्रम प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांकडून करुन घेतले पाहिजेत. म्हणजे माती व पाण्यात जाणारे प्लास्टिक कमी होईल. या उपक्रमशील उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक मांडवे, उपाध्यक्ष जैनुद्दिन ऊर्फ मुन्ना मुल्ला, रोहित शहा, अभिजित कर्पे आदींसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डाॅ. कुंडलिक मांडवे म्हणाले, ‘विज्ञानाची दृष्टी येण्यासाठी आवश्यक संधी, आणि योग्य प्रकारचे शिक्षण, यापासून सर्वसामान्य माणूस वंचितच राहिला. आपण ‘विज्ञानयुग’ आहे असं म्हणतो, त्यातही गेल्या काही दशकात, इलेक्ट्रॉनिक्सच्या आणि नंतर कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे तर, ही वाढ घातांकाच्या श्रेणीने होत आहे. मूलभूत गरजांच्या पूर्ततेपासून चैनीच्या वस्तूंच्या सहज उपलब्धतेपर्यंत, सगळ्याच गोष्टी, विज्ञानामुळेच साध्य आणि शक्य झाल्या आहेत.
रोहित शहा म्हणाले, ‘माहितीचा साठा आजच्या स्पर्धेच्या युगात हवा हे खरंच; पण कार्यकारण भाव शोधण्याची सवय होणं, तितकंच गरजेचं आहे. विज्ञान म्हणजे, केवळ जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, एवढंच नाही, तर समाजशास्त्रंही त्यातच येतात, कारण तिथेही कार्यकारण भाव आणि चिकित्सा लागतेच. म्हणूनच विज्ञान हे आपलं आहे, लोकांचं आहे, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं लौकिक आहे, इहलौकिक आहे.’
(चौकट..)
याप्रसंगी प्रयास सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्लास्टिक पिशव्या गोळा करून बाटलीत भरून ठेवल्या. याचा वापर कोणत्या पद्धतीने व कसा करायचा यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल असे उपाध्यक्ष जैन्नुदीन मुल्ला यांनी स्पष्ट केले. यापूर्वी नगरपंचायत प्रशासनाकडून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ काम करून शहरातील कऱ्हाड चौकात बगीचा केला आहे.तो बगीचा वडूजच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणून ओळखला जातो.
२८वडूज
फोटो: वडूज शहरातील प्लास्टिक कचरा निर्मूलन मोहिमेत सहभागी प्रयास सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. ( शेखर जाधव )