राष्ट्रवादी दादा गटाच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी अमित कदम, सरचिटणीसपद श्रीनिवास शिंदे यांच्याकडे
By नितीन काळेल | Published: October 25, 2023 06:27 PM2023-10-25T18:27:59+5:302023-10-25T18:29:04+5:30
लवकरच तालुका कार्यकारिणींचीही निवड होणार
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाकडून जिल्हा, तालुका कार्यकारिणी तयार करण्यासाठी हालचाली वाढल्या असून पहिल्या टप्प्यात जिल्हा कार्याध्यक्षपदी जावळीतील अमित कदम यांची निवड करण्यात आली. तर सरचिटणीसपद वाईमधील श्रीनिवास शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी ठरविण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला. तर बैठकीत जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून अमित कदम व जिल्हा सरचिटणीस पदावर श्रीनिवास शिंदे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
अमित कदम हे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सभापती आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. श्रीनिवास शिंदे यांना नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे. शिंदे हे आमदार मकरंद पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. दरम्यान, लवकरच तालुका कार्यकारिणींचीही निवड होणार असल्याचे सांगण्यात आले.