कऱ्हाड : केंद्र व राज्यातील सरकार हे आरोप असलेले सरकार आहे तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे पक्ष आरोपांनी बरबटलेले आहेत. अशांना लोक परत लोक निवडून देणार नाहीत. कारण लोकांनी त्यांचे पंधरा ते वीस वर्षांचे राजकारण बघितले आहे. याउलट भारतीय जनता पक्षाचे राजकारण अंत्योदय तत्त्वावर चालणार आहे. आरोग्यासह इतर कारणांसाठी काढलेल्या सर्व योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप सरकार कार्य करत आहे, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण स्मारक भवनमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा कॉफी विथ युवा संवाद हा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे उपस्थित होत्या.प्रमोद सावंत म्हणाले, ह्यआर्थिक मंदी फक्त भारतात नसून ती सबंध जगभर आहे. याचाही विचार सर्वांनीच केला पाहिजे. जीएसटीमध्येही बदल केले गेले आहेत. पंतप्रधान तसेच अर्थमंत्र्यांकडून घेतल्या गेलेल्या विविध निर्णयाचा फायदा अर्थनीतीमध्ये देशाला व राज्याला होणार आहे. औद्योगिकीकरण होणे हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या देशात विकासाची अनेक साधने आहेत. त्याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.
राफेल विमानाबाबत विरोधकांकडून अनेकवेळा आरोप केले गेलेत. सुरुवातीला खरेदीवरून आता पूजनवरून केले जात आहेत. दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक जण हा आपापल्या घरी शस्त्रपूजन करत असतो. राफेल विमानाचं पूजन केलं म्हणून काय बिघडलं?
आज महाविद्यालयीन तरुण युवकांना विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळवून देण्याचं काम खऱ्या अर्थाने भाजप करीत आहे. भाजपाने तरुणांवर खूप मोठा विश्वास टाकला आहे. लवकरच तरुणांच्या मदतीने देश एक आर्थिक महासत्ता बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.