सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीमध्ये खांदेपालट होणार आहे. पहिल्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने आता नवीन अध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच इतर निवडी केल्या जाणार असल्याने आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी पदाधिकारी निवडीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव यांची मुदत संपली असल्याने आता नव्याने पदाधिकारी निवडले जाणार आहेत. जिल्हा पदाधिकाऱ्यांची तसेच कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर तालुका पातळीवरील निवडी होणार आहेत. या निवडी होईपर्यंत समिंद्रा जाधव या प्रभारी महिला आघाडी अध्यक्षा राहणार आहेत.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक उपाध्यक्ष भारती शेवाळे आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने हे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादी भवनमध्ये घेणार आहेत.
या निवडीसाठी जिल्ह्यातील इच्छुक कार्यकर्त्यांकडून अर्ज मागविले आहेत. राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात अर्ज जमा करायचे असून महिलांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये केलेल्या कामाबाबतची माहिती अर्जासोबत द्यायची आहे.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. संपूर्ण राज्यात पक्षाची सर्वांत जास्त ताकद ही सातारा जिल्ह्यातच आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदेचे विविध गट तसेच लोकसभा, विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह सहकार क्षेत्रातील विविध संस्था या राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य राहण्यामध्ये विद्यमान पदाधिकाऱ्यांचाही मोठा वाेटा आहे. समिंद्रा जाधव यांनी महिलांचे केलेले संघटन तसेच सत्तेत नसतानाही महिलांना सोबत घेऊन जनतेच्या हितासाठी आंदोलने केलेली होती. आता सत्ता असताना जाधव यांनाच मुदतवाढ द्यावी, अशी बहुतांश महिला कार्यकर्त्यांनी मागणी लावून धरलेली आहे. मात्र, राष्ट्रवादी हा पक्ष लोकशाही मूल्यानुसार चालतो, त्यामुळे मुदत संपल्यानंतर पुन्हा नव्याने मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यामध्ये समिंद्रा जाधव यांच्यासह पक्षातील इतर इच्छुक महिलाही मुलाखतीला सामोऱ्या जाण्याची शक्यता आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांवर कोणती जबाबदारी?
राष्ट्रवादी हा राज्याच्या सत्तेतील महत्त्वाचा पक्ष आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या विरोधकांची संख्या वाढते आहे. भाजपचे पदाधिकारी प्रबळरीत्या आंदोलने करून सरकारला जेरीस आणण्याची संधी सोडत नाहीत. आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद आणखी वाढवणे जरुरीचे असून, जनतेमध्ये सरकारविषयी विश्वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान नवीन पदाधिकाऱ्यांसमोर असेल.