राष्ट्रवादी सोडलेली नाही; आजही मी पक्षातच - आमदार मकरंद पाटील
By दीपक शिंदे | Published: August 5, 2023 12:49 PM2023-08-05T12:49:06+5:302023-08-05T12:51:00+5:30
शरद पवार जितके महत्त्वाचे तितकेच अजितदादा ही
वाई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार हे आमचे दैवत आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे आजही मी राष्ट्रवादी पक्षातच आहे,’ अशी भूमिका आमदार मकरंद पाटील यांनी येथे व्यक्त केली. वाई येथील प्राथमिक शिक्षक विठ्ठल माने यांच्या निवृत्ती कार्यक्रमात त्यांनी प्रथमच कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.
आमदार पाटील म्हणाले, ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली नाही व सोडणारही नाही. शरद पवार हे आमचे दैवत आहेत. त्यांना कधीही विसरू शकत नाही. २००९ पासून मतदारसंघात झालेला विकास तुम्हाला वाटत असेल तर तो फक्त अजित पवार यांच्यामुळे हे आपल्याला मान्य करावे लागेल. अन्य कोणामुळे नाही. त्यामुळे शरद पवार जितके महत्त्वाचे तितकेच अजितदादा ही महत्त्वाचे आहेत.
आर्थिक अडचणीतील किसन वीर कारखान्याची जबाबदारी घेण्यास तयार नव्हतो. त्यावेळी तुम्ही कार्यकर्त्यांनीच निवडणूक लढवून कारखाना ताब्यात घेण्याची मागणी वारंवार केली होती. कारखाना वाचला पाहिजे, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले पाहिजेत. असे तुम्ही म्हणत होतात. मागील वर्षी कारखाना ताब्यात आल्यानंतर सभासदांनी दिलेल्या भांडवलावर कारखाना सुरू केला. त्यानंतर वर्षभरात आपल्याला कोणत्याही बँकेने मदत केलेली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आता कारखाना सुरळीत चालवण्यासाठी अजित पवार यांचे मार्गदर्शन व मदतीची गरज लागणार आहे.
मकरंद पाटील म्हणाले, खंडाळा तालुक्यात ट्रामा सेंटर, महाबळेश्वर तालुक्यात अनेक छोट्या - मोठ्या कामांना निधी उपलब्ध झाला आहे. २००९ मध्ये माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे मूळ गाव नांदवळ येथे सभा होती. या सभेमध्ये सूत्रसंचालन केल्यामुळे शासकीय सेवेत असलेल्या विठ्ठल माने यांना आचारसंहितेचा भंग केल्यामुळे निलंबित केले होते. मात्र, अजित पवार यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच विठ्ठल माने यांना पुन्हा सेवेमध्ये संधी मिळाली, याची आठवण मकरंद पाटील यांनी करून दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस प्रताप पवार, तालुका सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर, किसन वीर खंडाळा तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, राजेंद्र तांबे आदी उपस्थित होते.