कऱ्हाड :
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपी प्रश्नी गुरुवारी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी तत्पूर्वीच ताब्यात घेतल्याने ते आंदोलनस्थळी पोहोचू शकले नाहीत. दरम्यान, मंत्री बाळासाहेब पाटील व राजू शेट्टी यांच्यात शासकीय विश्रामगृहावर चर्चा झाली, पण तोवर शासकीय विश्रामगृहालाच आंदोलनस्थळाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना १४ दिवसांत एफआरपी रक्कम देणे कायद्याचा भाग आहे. मात्र, तरीही ती रक्कम दिली जात नाही. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील अध्यक्ष असणाऱ्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यानेही एफआरपी दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सह्याद्री कारखान्यावर गुरुवारी (दि. २५) धरणे आंदोलन करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्यामुळे या आंदोलनाकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते.
दरम्यान, पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर काल रात्रीपासूनच लक्ष ठेवले होते. त्यात राजू शेट्टी सांगलीवरून कऱ्हाडला आंदोलनासाठी येत असतानाच गुरुवारी सकाळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलक आंदोलनस्थळी पोहोचू शकले नाहीत.
राजू शेट्टी यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस त्यांना कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहावर घेऊन आले. ही माहिती स्वाभिमानी कार्यकर्त्यांना समजताच कार्यकर्तेही विश्रामगृहाबाहेर मोठ्या संख्येने जमले. विश्रामगृहात राजू शेट्टी व त्यांचे शिष्टमंडळ यांची मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर सुमारे अर्धा तास चर्चा झाली. एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर त्वरित कारवाई करा. पैसे न मिळाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. अशातच वीज बिल न भरल्याने त्यांची वीज कनेक्शन तोडली जात आहेत. शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं, असा प्रश्न स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सहकारमंत्र्यांना केला. सहकारमंत्र्यांनी आंदोलकांचे मत जाणून घेऊन एफआरपीबाबत मीही आग्रही आहे. ती न देणाऱ्यांवर कारवाईबाबत त्यांनी आश्वासित केले, पण त्यासाठी थोडा वेळ द्या, मी एक एप्रिलला आढावा घेतो. मग कारवाई करतो, असे सांगून मंत्री पाटील यांनी आंदोलकांचा निरोप घेतला.
चौकट:
आतमध्ये चर्चा बाहेर घोषणा ..
मंत्री बाळासाहेब पाटील व स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्यात मागण्यांबाबत विश्रामगृहात चर्चा सुरू होती, पण तोवर बाहेर कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता .त्यामुळे शासकीय विश्रामगृहाला आंदोलनस्थळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. घोषणा ऐकून इतरांनीही तेथे गर्दी करायला सुरुवात केली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
चौकट:
म्हणे, आंदोलन दडपण्याचा प्रश्नच नाही !
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चर्चेवेळी तुम्ही आमचे आंदोलन दडपत आहात, असा आरोप केला. त्यावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, तुमचा आरोप चुकीचा आहे. तसे असते तर मी तुम्हाला येथे भेटायला आलो असतो का ? मुळात तुम्ही २२ तारखेला आंदोलन करणार होता. ती तारीख का बदलली मला समजले नाही, असेही मंत्री पाटील म्हणाले.
फोटो:
कऱ्हाड येथे गुरुवारी शासकीय विश्रामगृहाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.