कऱ्हाड : ‘संतांनी निसर्गात देव शोधला. हेच काम निसर्गवारीच्या माध्यमातून सुरू आहे. निसर्गवारी ग्रुप वृक्ष संवर्धनाचे जे काम करतोय ते सर्वश्रेष्ठ आहे,’ असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले.
पुनर्वसित डिचोली-धोंडेवाडी (ता. कऱ्हाड) येथे निसर्गवारीतर्फे आयोजित वृक्ष लागवड मोहिमेच्या समारोपप्रसंगी सिंह बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, निसर्गवारी ग्रुपचे प्रमुख सतीश मोरे, सहप्रमुख रणजित पाटील, सदस्य व नगरसेवक विजय वाटेगावकर, गौतम करपे, संदीप सूर्यवंशी, अभिजित सूर्यवंशी, डॉ. अमित खाडे, जिल्हा परिषद सदस्य मंगलताई गलांडे, सरपंच रेखा काकडे, बाळासाहेब कोळेकर, माणिक गंगवणे, अनिल पवार, संजय काकडे, शैलेश पाटील उपस्थित होते.
शेखर सिंह म्हणाले, ‘निसर्गवारीच्या माध्यमातून हाती घेतलेला वृक्ष लागवडीचा उपक्रम कौतुकास्पद आहे. झाडे म्हणजे देव आहेत. झाडांमधील देवाला ओळखून निसर्गवारीच्या माध्यमातून काम झाले आहे. निसर्गवारी ग्रुप जे काम करतोय ते सर्वश्रेष्ठ आहे. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन समाजाला दिशा देणारे ठरेल. पहिला पाऊस जून-जुलै, ऑगस्टमध्ये पडत होता. मात्र, गत काही वर्षांपासून पाऊस अवेळी पडत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे झाडे लावण्यामध्ये शेतकरी बांधवांचा वाटा मोठा असला पाहिजे. आपण आषाढीवारीनिमित्त झाडे लावतो आहे. त्यामध्ये विठ्ठलाचे रुप म्हणून त्यांचे संगोपन करा. डिचोली ग्रामस्थ झाडांची काळजी घेतील. सयाजी शिंदेसुद्धा वृक्ष लागवड व संवर्धनाची संकल्पना राबवत असतात. सातारा जिल्ह्यात वृक्ष लागवडीबाबत चळवळ उभी राहत आहे, याचे समाधान आहे.’
यावेळी सतीश मोरे, बाळासाहेब कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन काकडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सुरेश चौघुले यांनी आभार मानले.
- चौकट
‘वडाची डिचोली’ म्हणून गाव ओळखले जाईल..
पुनर्वसित डिचोलीमधील ग्रामस्थ वृक्षप्रेमी आहेत. येथील प्रत्येकाच्या घरासमोर लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडे याची जाणीव करून देत आहेत. वृक्षांबाबत त्यांचे प्रेम पाहूनच येथे जास्तीत जास्त झाडे लावण्याचा निर्णय निसर्गवारी ग्रुपने घेतला आहे. येथे आणखी १०४ झाडे लावण्यात आली आहेत. यातील ७५ झाडे वडाची आहेत. भविष्यात हे गाव केवळ डिचोली म्हणून नव्हे तर वडाची डिचोली म्हणून ओळखले जाईल, असा आशावाद सतीश मोरे यांनी व्यक्त केला.
फोटो : २१ केआरडी ०४
कॅप्शन : डिचोली-धोंडेवाडी (ता. कऱ्हाड) येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.