सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात गुरुवारपासून पावसाचा जोर कमी झाला असलातरी गतवर्षीपेक्षा यंदा पर्जन्यमान अधिक झाले आहे. त्यामुळे नवजाच्या पावसाने साडे तीन हजार मिलीमीटरचा टप्पाही पार केला आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठा ६७ टीएमसी झाला आहे. हा साठा मागीलवर्षीपेक्षा जादा आहे. त्याचबरोबर २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजाला १३० आणि महाबळेश्वरला ९५ मिलीमीटर झाला आहे.पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयनासह, महाबळेश्वर परिसरात मागील एक महिन्यापासून पाऊस पडत आहे. त्यातच १५ दिवसांपासून पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळीसह कोयना धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. परिणामी बहुतांशी धरणे ही ६० टक्क्यांवर भरली आहेत. तर पावसाळ्याचे अजून दोन महिने असल्याने सर्व प्रमुख धरणे भरु शकतात. मात्र, सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे.गुरुवारपासून पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९४ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे १३० मिलीमीटरची नोंद झाली आहे. एक जूनपासूनचा विचार करता आतापर्यंत कोयना येथे २५५३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे सर्वाधिक ३५९३ आणि त्यानंतर महाबळेश्वरला ३३५२ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक टिकून आहे. तर सकाळच्या सुमारास धरणात ३१ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ६६.९० टीएमसी झालेला. त्याचबरोबर गुरुवारी रात्रीपासून धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्ग वाढवून २१०० क्यूसेक करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.
मागीलवर्षी महाबळेश्वरला ३ हजार मिलीमीटरची नोंद...जिल्ह्यात यावर्षी पावसाला उशिरा सुरूवात झाली असलीतरी प्रमाण चांगले आहे. त्यामुळे पावसाने मागीलवर्षीचा टप्पा ओलांडला आहे. गेल्यावर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत कोयनेला २२३१, नवजा येथे २८६१ आणि महाबळेश्वरला २९९७ मिलीमीटर पाऊस पडला होता.