कऱ्हाड : येथील पालिकेची निवडणूक यंदा वेगवेगळ्या कारणांनी रंगतदार होणार आहे. सर्वच पक्षांचे नेते सध्या तोफेमध्ये दारू भरून तयार आहेत. येत्या दोन दिवसांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली तर विशेष वाटायला नको. मागासवर्गीय महिलेसाठी नगराध्यक्ष पद आरक्षित झाल्याने निवडणुकीत काही ‘राम’ उरणार नाही, असे काहींना वाटू लागले; पण आघाडीच्या नेत्यांनी भात्यातले एक-एक ‘बाण’ बाहेर काढल्यानंतर अनेकजण एकमेकावर निशाणा धरू लागले आहेत. काहींच्या मैदानात पुढे शत्रू नाहीत. काहींच्यासमोर तयारीचे प्रतिस्पर्धी दिसत नाहीत; पण काही प्रस्थापितांसमोर मात्र नवख्यांनी मोठे आव्हान निर्माण केल्याने त्याची चर्चा कऱ्हाडात रंगू लागली आहे.पालिकेतील एकूण विद्यमान नगरसेवकांपैकी १३ नगरसेवकच सध्या रिंगणात उतरलेले दिसतायत. तर काही प्रभागांत माजी नगरसेवकांनी पुन्हा शड्डू ठोकले आहेत. त्यामुळे काही प्रभागांतील निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेतच. तर काही प्रभागांत प्रस्थापितांसमोर नवख्यांनी उभे केलेले आव्हान त्यांना किती पळायला लावणार, की त्यांना मैदानातून बाहेर काढणार, हे निकालानंतरच कळणार आहे. प्रभाग दोनमधून महंमदचांद बागवान व विनायक पावसकर हे दोन विद्यमान नगरसेवकच आमने सामने लढत आहेत. तर याच प्रभागातून विद्यमान नगरसेविका अरुणा जाधव यांच्याविरोधात प्रियांका यादव व स्वाती मोहिते या दोघींनी चांगलेच आव्हान उभे केले आहे. प्रभाग चारमध्ये विद्यमान नगरसेवक राजेंद्र माने यांच्याविरोधात उत्तरचे आमदारबंधू जयंत पाटील उभे ठाकले आहेत. तर भाजपनेही पाटील भावकीतीलच एकाला उमेदवारी देत या निवडणुकीत रंगत आणली आहे. प्रभाग पाचमध्ये विद्यमान नगरसेविका शैलजा फल्ले यांना माजी नगरसेविका विद्या पावसकर यांनी थेट आव्हान दिले आहे. आसमा खैरतखान याही येथून आपली ताकद आजमावत आहेत. प्रभाग सहामधून नगरसेवक विजय वाटेगावकर यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार झुंज देणार आहेत. प्रभाग सातमध्ये विद्यमान नगरसेवक हणमंत पवार यांच्याविरुद्ध नगरसेविका अॅड. विद्याराणी साळुंखे यांचे बंधू प्रताप साळुंखे यांनी दंड थोपटले आहेत. तर माजी उपनगराध्यक्ष फारूख पटवेकर यांनी जनशक्तीला रामराम ठोकत या प्रभागातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याने येथे लक्षवेधी लढत होण्याची चिन्हे आहेत. प्रभाग आठमधून नगरसेविका शीतल वायदंडे यांच्यावर अपक्ष उभे राहण्याची वेळ आली आहे. तर ज्येष्ठ नगरसेवक जयवंत पाटील यांच्याविरोधात लोकशाहीला मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे यांना उमेदवारी द्यावी लागली आहे. प्रभाग नऊमध्ये माजी नगरसेविका सावित्री मुठेकर पुन्हा नशीब आजमावत असून, नगरसेवक सदाशिव यादव यांच्यापुढेही नवख्या उमेदवारांनी आव्हान निर्माण केले आहे. विद्यमान नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव प्रभाग दहामधून निवडणूक लढवित असून, त्यांच्याविरोधात प्रतिस्पर्धी आघाड्यांनी उमेदवार दिला नसला तरी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी इंद्रजित गुजर यांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे. तर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक यांनी आपले पुत्र रविराज रैनाक यांच्या हातात शिवधनुष्य दिले आहे. रामभाऊंच्या वारसदारांना ते किती पेलणार, हे निकालानंतरच कळेल. पालिकेतील विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान प्रभाग अकरामधून पुन्हा रिंगणात उतरल्या असून, त्यांच्याविरोधात माजी नगरसेविका रत्ना विभुते यांच्यासह अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. तर याच प्रभागातून माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार एमआयएमचा झेंडा फडकविण्याचा विचार करीत असून, त्यांच्याविरोधात दोन नवखे उमेदवार ताकद पणाला लावून लढत आहेत. प्रभाग चौदामधून मोहसिन आंबेकरी व मंदा खराडे हे दोन विद्यमान नगरसेवक रिंगणात उतरले असून, त्यांच्याविरोधातही नवखेच चेहरे झुंज देत आहेत. (प्रतिनिधी) नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष रिंगणाबाहेरच !होऊ घातलेल्या निवडणुकीत विद्यमान नगरसेवकांनी आपल्याला उमेदवारीची ‘लॉटरी’ परत कशी लागेल यासाठी प्रयत्न केले. मात्र, आरक्षण आणि प्रभाग बदलल्याने अनेकांची गोची झाली. काहींनी त्यावर मार्ग काढत नजीकच्या प्रभागात उभे राहणे पसंद केले. मात्र, संधी असतानाही विद्यमान नगराध्यक्षा संगीता देसाई व उपनगराध्यक्ष सुभाष पाटील दोघेही रिंगणाबाहेर आहेत. याबाबत नागरिकांच्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.वाटेगावकरांच्या ‘वाटेत’ फक्त अपक्ष !प्रभाग क्रमांक सहामधून विद्यमान नगरसेवक विजय वाटेगावकर लढत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी अर्ज दाखल केल्याने या लढतीत ‘विक्रमी’ स्पर्धा होईल, अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचा अर्ज मागे घेण्यात आल्याने वाटेगावकरांचा यशाचा मार्ग सुकर बनल्याचे बोलले जात आहे. प्रभाग क्रमाक सहामधून नगरसेवक विजय वाटेगावकर हे स्वत: नशीब अजमावत आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी..! नगराध्यक्षपद मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित असल्याने नगरसेविकांपैकी लिना थोरवडे व शीतल वायदंडे दोघींही इच्छुक होत्या. मात्र, थोरवडे यांना लोकशाही आघाडीकडून उमेदवारी मिळाली; पण वायदंडे यांना जनशक्तीने ‘चार हात’ दूर ठेवले. अपक्ष म्हणून त्यांचा अर्ज रिंंगणात दिसतोय. बाळूताई सूर्यवंशी याही ‘जनशक्ती’कडून इच्छुक होत्या. मात्र, त्यांनाही उमेदवारी मिळाली नाही. आज प्रत्यक्षात नगराध्यक्षपदासाठी १२ उमेदवार रिंगणात दिसत आहेत; पण नवखे चेहरे विद्यमानांसमोर आव्हान उभे करणार, हे निश्चित! शारदा जाधव बिनविरोध !माजी नगराध्यक्षा शारदा जाधव यांनी स्वत:च्या प्रभाग सातमधून निवडणुकीची तयारी केली होती. मात्र, ‘जनशक्ती’चा मेळ घालताना त्यांनी स्वत: दोन पावले मागे घेत नजीकच्या प्रभाग सहामध्ये जाणे पसंद केले. या प्रभागात नव्याने प्रचारयंत्रणा राबविताना त्यांना अडचण येणार असे वाटत होते. पण ‘लांब उडी मारायची असेल तर दोन पावले मागे घ्यावी लागतात,’ असे म्हणतात. त्याची प्रचिती जाधव यांना आली अन् त्यांची निवडच बिनविरोध झाली.
कऱ्हाडात प्रस्थापितांसमोर नवख्यांचे आव्हान
By admin | Published: November 14, 2016 9:26 PM