आॅनलाईन लोकमतमायणी (जि. सातारा), दि. २३ : नाभिक समाजाचा अनुसुचित जातीमध्ये सामावेश करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील तमाम नाभिक बांधवांच्या वतीने सोमवार, दि .२४ रोजी मुंबई येथील आझाद क्रांती मैदानावर महामोचार्चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सातारा जिल्ह्यातील सर्व नाभिक समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अरुण सुरमुख यांनी केले आहे.
ते म्हणाले, नाभिक समाज गेली ५० ते ६० वर्षांपासून अनुसूचित जातीमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी करीत आहे. भारत सरकारने नाभिक समाजाच्या मागणीची दखल घेत ती मान्य केली व प्रत्येक राज्यांना आरक्षण लागू करण्याचे आदेश दिले. देशातील काही राज्यात नाभिक समाजाला अनुसूचित जातीमध्ये आरक्षण लागू करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्र सरकार हे आरक्षण लागू करण्यात चालढकल करीत आहे. सरकारने हे आरक्षण त्वरीत लागू करावे म्हणून राज्यातील तमाम नाभिक समाजबांधव सोमवार, दि. २४ रोजी आझाद क्रांती मैदानावर एकत्र येऊन महामोर्चा काढणार आहेत.
नाभिक समाजातील सर्व संघटनांनी आपापसातील मतभेद बाजूस ठेवून या महामोर्चास उपस्थित रहावे. आता नाही तर पुन्हा नाही याचे भान ठेवून हा महामोर्चा यशस्वी करावा, असे आवाहनही सुरमुख यांनी केले आहे. या संदर्भात मायणी येथे नाभिक समाजाची बैठक होऊन या महामोर्चास पाठींबा व्यक्त करण्यात आला.