पुसेगाव : शालेय जीवनात विद्यार्थ्यांना आपल्या देशाविषयी प्रेमभावना निर्माण करण्यासाठी तसेच भविष्यात विविध संरक्षण दलात सहभागी होऊन देशसेवा करण्याची संधी मिळावी या हेतूने विद्यालयात एनसीसी हा प्रकल्प सुरू केलेला आहे. या एनसीसी प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन गुरुवारी करण्यात आले.
यासाठी २२ महाराष्ट्र बटालियन सातारा एनसीसी प्रमुख कर्नल बी. एस. काशीद, सुभेदार उदय पवार, सुभेदार दीपक शिंदे, यशवंत पवार, हवालदार संदीप बानगुडे, प्रशांत बोबडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून एनसीसीसाठी विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेऊन निवड केली. कर्नल काशीद यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त लागावी तसेच विद्यार्थी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी सदैव तत्पर राहावे याविषयी मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. डी. जाधव यांनी विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये सहभागी घेऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, स्कूल कमिटीचे सदस्य मोहन जाधव, संतोष जाधव उपस्थित होते. पर्यवेक्षक पी. पी. घाटगे यांनी प्रस्ताविक केले. एम. के. यादव यांनी सूत्रसंचालन केले. विभाग प्रमुख पी. एम. झाटे यांनी आभार मानले.