लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : गेल्या चार दिवसांपासून राज्यातील शेतकरी संपावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून संप मिटवण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफी करण्याची सरकारची इच्छा असेल तर वाट कोणाची पाहताय, असा सवाल करत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष कराल तर सरकार बदलण्याची ताकद या शेतकऱ्यांमध्ये आहे, असा इशारा आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.दरम्यान, या शेतकरी संपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून कर्जमाफी मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार त्यांनी केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, युवकचे बाळासाहेब महामुलकर उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, पाच जूनला शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्रीय सहभागी होणार आहे. जिह्यातील सर्व घटकांनी, संघटनांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे. आंदोलनाला पाठबळ द्यावे. या आंदोलनाला कोणताही राजकीय रंग नाही. तशा पद्धतीची भाजपाची खेळी आहे, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. यासाठी अनेक संघटना, शेतकरी या आंदोलनात उतरल्या आहेत. जिह्यात आमदारांनी प्रत्येक तालुक्यात जबाबदारी घेतली आहे. मात्र, हे सरकार पोलिस बळाचा वापर करत आहे. सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असती तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. परंतु खोट बोलून फसवण्याचे धोरण आहे. मुख्यमंंत्री कोणाची वाट पहात आहेत. आता जे त्यांनी जाहीर केले. छोटा शेतकरी आणि मोठा शेतकरी, हे साफ चुकीचे आहे. पश्चिम महाराष्ट्राला डावलण्याची भिती वाटत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रात्रीपर्यंत बैठका होतात. हे आंदोलनाचे यश आहे. हे सरकार अस्थिर करण्याची ताकद शेतकऱ्यांच्यामध्ये आहे, असे त्यांनी सांगितले. आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. हे आंदोलन पक्ष विरहित आहे. आंदोलनाची धार वाढवण्याची जबाबदारी आमदारांवर आहे. काही लोकांवर केसेस करण्याचा सपाटा लावला आहे. हवेत गोळीबार करु लागलेत. दरोड्याचे गुन्हे दाखल करु लागलेत. ही हुकूमशाही आहे. एका बाजूला शेतकऱ्यांचे कैवारी आहेत म्हणून सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करायचे, असा टोलाही आमदार शिंदे यांनी लगावला.
शेतकऱ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादी सक्रीय : शिंदे
By admin | Published: June 04, 2017 10:37 PM