सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जतच्या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी साताराच्या जागेवर दावा सांगितला होता. तसेच माढ्यासाठीही आग्रही राहणार आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय चार-पाच दिवसांत निर्णय होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईत बुधवारी सकाळी ११ वाजता बैठक झाली. राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, रूपाली चाकणकर, आ. मकरंद पाटील आ. दीपक चव्हाण, माढा मतदारसंघाचे आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांच्या दोन्ही मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत सातारा व माढा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहावा असा जोरदार आग्रह दोन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी केला. जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी विचारांचा आहे. त्यामुळे हे दोन्ही मतदार संघ राष्ट्रवादीकडे रहावेत, अशी आग्रही मागणी यांनी केली.राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनीही १९९९ पासून सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा अशी मागणी केली. त्याचबरोबर प्रमोद शिंदे, नितीन भरगुडे पाटील यांच्या अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दाेन्ही मतदार संघाची जोरदार मागणी केली.
आ रामराजे नाईक निंबाळकर, आ. मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांचा भावना विचारात घेवून दोन्ही मतदारसंघातील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी वरिष्ठांनी घेतली आहे. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळावेत अशी मागणी केली.या सर्व खलबतानंतर खा. सुनील तटकरे यांनी येत्या चार ते पाच दिवसात महायुतीची बैठक होणार असून यावेळी यासंदर्भात निर्णय होतील असेही सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले. लोकसभा निवडणुकांच्या जागा-वाटपाचे गुर्हाळ महाराष्ट्रात सुरू असून यातून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांसह जिल्हावासियांनाही लागली आहे.