थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 09:48 AM2024-11-25T09:48:17+5:302024-11-25T09:50:07+5:30
काका-पुतण्याच्या या भेटीवेळी अजित पवार यांनी रोहित पवारांची फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं.
NCP Ajit Pawar ( Marathi News ) : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या प्रीतीसंगम या समाधीस्थळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे दाखल झाले होते. त्यानंतर काही वेळातच तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हेदेखील पोहोचले. काका-पुतण्याच्या या भेटीवेळी अजित पवार यांनी रोहित पवारांची फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवार यांचं विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांनी अभिनंदन केलं आणि मिश्किलपणे काकाचं दर्शन घे, असंही म्हटलं. त्यानंतर रोहित यांनीही अजित पवारांच्या पाया पडत आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं.
रोहित पवार यांचा कर्जत-जामखेडमध्ये थोडक्या मतांनी विजय झाला आहे. यावरून चिमटा घेत अजित पवार आजच्या भेटीवेळी त्यांना म्हणाले की, "शहाण्या...थोडक्यात वाचलास. माझी सभा झाली असती तर काय झालं असतं?"
काकाचं दर्शन घे, मी सभा घेतली असती तर...; प्रीतीसंगमावर भेट होताच अजितदादांनी घेतली पुतण्याची फिरकी! pic.twitter.com/o8HUuECNVX
— Lokmat (@lokmat) November 25, 2024
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज सकाळी प्रीतीसंगम येथे जात आपले राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले.
कर्जत-जामखेडमध्ये अटीतटीच्या लढतीत रोहित पवारांचा विजय
कर्जत-जामखेडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांचा १२४३ मतांनी विजय झाला आहे. रोहित पवार यांना १ लाख २७ हजार ६७६ मते मिळाली. तर महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांना १ लाख २६ हजार ४३३ मते मिळाली आहे. ट्रम्पेट या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना ३४८९ मते मिळाल्याचा फटका रोहित पवार यांना बसल्याचे पाहायला मिळाले. तर अपक्ष राम नारायण शिंदे यांना ३९२ तर नोटाला ६०१ मते मिळाली.