नवनाथ जगदाळेदहीवडी : जिल्हा परिषदेचा मार्डी गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपत संघर्ष होणार असून ‘रासप’ची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यामुळे या गटातील निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
माण तालुक्यात मार्डी जिल्हा परिषद गट आहे. माण तालुक्याचे किंगमेकर ठरलेल्या दिवंगत सदाशिवराव पोळ यांचा हा गट कायम बालेकिल्ला राहिला. मार्डी गणाचा एकवेळ अपवाद वगळता या गटाने नेहमीच राष्ट्रवादीची पाठराखण केली. त्यामुळे हा गट राष्ट्रवादीसाठी सर्वांत मजबूत गट मानला जातो. हा गट ताब्यात घेण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी ताकदीनीशी प्रयत्न केले. मात्र, यशापर्यंत पोहोचता आले नाही. गतवेळेच्या दोन्ही निवडणुकांत या गटामध्ये ‘रासप’चे नेते बबन वीरकर यांनी लक्ष घातले. याशिवाय राष्ट्रवादीच्या मदतीने ‘रासप’च्या लतिका वीरकर यांनी पंचायत समिती सदस्य, तर त्यानंतर सभापतीपदही भूषविले. त्यामुळे भविष्यातील होणाऱ्या राष्ट्रवादी आणि भाजप संघर्षात रासप निर्णायक ठरू शकणार आहे. गटात राष्ट्रवादी मजबूत असली तरी त्यांना छोट्या घटकांना सामावून घ्यावे लागणार आहे.
या गटाला राष्ट्रवादीने नेहमीच ताकद दिली आहे. कमल पोळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, त्यानंतर विद्यमान सदस्या आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली पोळ यांना जिल्हा परिषदेमध्ये मानाचे पद देऊन विकासकामासाठी ताकद दिली आहे. सोनाली पोळ यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. पती मनोज पोळ यांच्या सहकार्याने त्यांनी राणंद-मार्डी अशी पेयजल योजना मंजूर करून घेतली. म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी अडीच ते तीन कोटींचा निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला. कोरोना काळात कोणीही मदतीला येत नव्हते. अशावेळी स्वत: लोकांना मदत केली. राष्ट्रीय पालनपोषण, कुपोषणमुक्त अभियानात महिला व बालकल्याण सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. या कामामुळे सातारा जिल्हा परिषदेला सलग दोन वर्षे देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. कोरोना काळातही अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना प्राण गमवावे लागले. त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविले, तसेच गटात २५ कोटींपेक्षा अधिक रुपयांची कामे आणली आहेत.
मार्डी गणाचे रमेश पाटोळे व वरकुटे गणाच्या लतिका वीरकर या दोघांनाही सभापतीची संधी मिळाली. त्यांनीही अनेक विकासकामे केली, तर दुसरीकडे आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून राजू पोळ यांनी या गटात भाजपची ताकद वाढविली आहे. डॉ. उज्ज्वलकुमार काळे, डॉ. महादेव कापसे यांचेही सहकार्य लाभले. बाजार समितीत विलास देशमुख यांना सभापतीची संधी देत मार्डी गट मजबूत करण्यावर भाजपने भर दिला आहे.
महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून कार्यरत असून, जिल्हा परिषदेला राष्ट्रीय पालनपोषण, कुपोषणमुक्त अभियानात सलग दोन वर्षे देशपातळीवर पुरस्कार मिळवून दिला. राणंद-मार्डी पेयजल योजना, म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान आहे. - सोनाली पोळ, सभापती महिला व बालकल्याण समिती
आमदार जयकुमार गोरे यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाजार समिती सभापतीपदाची संधी दिली आहे. त्यामुळे यापुढे गटात पक्षाची ताकद वाढविणार आहे. प्रसंगी इतर पक्षांना बरोबर घेऊन या गटात सक्षम पर्याय देणार आहे. - विलास देशमुख, सभापती माण बाजार समिती