सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आता राष्ट्रवादी व भाजपचे नवे सत्ता पर्व उदयाला आले आहे. बँकेचे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडताना संघर्षाचे राजकारण टाळून परंपरा कायम ठेवलेली आहे. सुरुवातीला अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर उपाध्यक्षपद भाजपकडे देण्यात आले आहे.
आपल्या वेगळ्या आणि उठावदार कार्यपद्धतीमुळे जिल्हा बँकेने संपूर्ण देशात नावलौकिक मिळवला आहे. या बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक पार पडली. २१पैकी ११ जागा बिनविरोध करण्यात या नेत्यांना यश आले. तसेच उरलेल्या दहा जागांवर विरोधकांचे पॅनल होऊ शकले नाही. तरीदेखील चार जण अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड करताना सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रवादीने बिनविरोधची परंपरा कायम राखली आहे.
अध्यक्षपदासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले इच्छुक होते. त्यांनी खासदार शरद पवार यांचीही भेट घेतली होती. या परिस्थितीमध्ये पदाधिकारी निवडताना संघर्ष होऊ शकतो, अशी चर्चा होती. मात्र, शिवेंद्रसिंहराजेंनी हा संघर्ष टाळला. उपाध्यक्षपद आपल्या निकटवर्ती कार्यकर्त्याला मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले, तर राष्ट्रवादीलाही अध्यक्ष पद मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या मनातील उलट-सुलट भावना दूर झाल्या.
नेत्यांचा समजूतदारपणा... कार्यकर्त्यांची चलबिचल थांबली
जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यानंतर तर राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या. या परिस्थितीत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडताना राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांमध्येही याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषक सांगत होते. त्यातूनच राष्ट्रवादीने अध्यक्षपद सोडू नये, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत होती. मात्र, नेत्यांनी समजूतदारपणा दाखवल्याने कार्यकर्त्यांच्या मनातील भीती दूर झाली आहे.
नेत्यांची गोपनीय बैठक...
जिल्हा बँकेत सोमवारी सकाळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार प्रभाकर घार्गे यांची बैठक झाली. या बैठकीतच अध्यक्षपदासाठी नितीन पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी अनिल देसाई यांचे नाव अंतिम करण्यात आले.
शिवेंद्रसिंहराजेंनी दाखवला मनाचा मोठेपणा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नावलौकिक सातासमुद्रापार पसरलेला आहे. निवडणुकीच्या काळात बरंच काही घडून गेलं आहे. आता बँकेचा नावलौकिक टिकून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीमध्ये विशेषतः शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. त्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्या, अशी भावना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.