राष्ट्रवादीत फूट नाही, अजितदादा आमचेच नेते आहेत असं काल काहींनी जाहीर केलं, असं पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांना संवादादरम्यान म्हटलं. यावर अजित पवार आमचेच आहेत. त्यात काही वाद नाही. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे, असं विधान शरद पवार यांनी केलं.
शरद पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र या विधानाला अवघे काही तास झाले असताना शरद पवारांनी पुन्हा एक नवीन विधान केलं आहे. शरद पवार म्हणाले की, अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी म्हणालो नाही. सुप्रिया सुळे त्यांची धाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
“शरद पवार मोठे नेते आहेत, अजितदादांची घरवापसी होईल”; काँग्रेस नेत्याचा वेगळाच दावा
एकदा पहाटेचा शपथ विधी झाला होता. दोन लोकांचा हा शपथविधी होता. त्यात आमचेही एक सहभागी होते. त्यावेळी आम्ही निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून जे झालं ते योग्य नव्हतं, आता त्या मार्गाने जाणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली.त्यामुळे आता संधी वारंवार मागायची नसते आणि मागितली तरी ती द्यायची नसते, असं सांगत शरद पवारांनी अजित पवारांबाबतची आपली ठाम भूमिका मांडली आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडी काही फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेपुरती मर्यादित नसून देशपातळीवर आहे. शरद पवारांच्या वक्तव्याचा इंडिया आघाडीवर परिणाम होणार नाही. मात्र संभ्रम निर्माण होऊ शकतो. आम्ही आमची भूमिका अमच्या पक्ष प्रमुखाकडे सातत्याने मांडल्या आहेत. राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत आम्ही पक्षप्रमुखाकडे विचार मांडत असतो, असे अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे सांगितले.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
काल खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीतील फुटीबाबत प्रतिक्रीया दिली होती. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असे सांगतानाच राज्यात एक उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत. दुसरे कुठले आहेत? कुठल्या पक्षाचे आहेत? मला माहिती नाही, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले. पुणे महापालिकेत मतदारसंघातील प्रश्नासंदभाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.