सातारा : राज्याच्या विधानसभेत ज्या पध्दतीने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे सरकार तयार झाले, त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातदेखील या तिन्ही पक्षांनी एकत्र येत भाजपला बाजूला ठेवण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकांत आघाडी कायम ठेवलेली आहे. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये त्यांना यश आले नसले, तरी काही ग्रामपंचायतींमध्ये ही आघाडी झालेली आहे.
जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यातील १२३ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध करण्यात नेत्यांना यश आले, तर ९८ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. ६५४ ग्रामपंचायतींची निवडणूक लागलेली आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये यशस्वी करण्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना यश आले. त्या धर्तीवर ग्रामपंचायत निवडणुकीमध्येदेखील आघाडी करून भाजपला रोखण्याचा प्रयोग या पक्षांनी केला आहे. काही ठिकाणी त्यांना यश आले; मात्र काही ठिकाणी राष्ट्रवादी वगळता इतर पक्षांची ताकदच कमी पडत असल्याने राष्ट्रवादीनेच खिंड लढवायला घेतल्याचे चित्र आहे.
विशेषत: वाई, कऱ्हाड, जावळी, सातारा, माण, खटाव या तालुक्यांमध्ये भाजप हा तिन्ही पक्षांचा प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. या तालुक्यांतील मूळचे काँग्रेस अथवा राष्ट्रवादीत असणारे नेते भाजपमध्ये गेले असल्याने राष्ट्रवादीने काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुकीचे डावपेच आखले आहेत. आता निवडणुकीनंतरच खरे चित्र पुढे येईल. सध्या तरी निवडणुकीचा प्रचार त्वेषाने सुरू आहे.
निकालानंतर महाआघाडीचा खराखुरा चेहरा समोर येणार
n राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी जिल्ह्यातील काही गावांत एकत्र येण्यासाठी आवाहन केले. काही गावांत त्याला यशही आल्याचे पाहायला मिळते.
n राष्ट्रवादीवर नाराज असलेले जिल्ह्यातील स्थानिक नेते भाजपच्या कळपात गेले असल्याने अनेक ठिकाणी संघर्ष पेटला आहे. अशा गावांत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी युती करण्याबाबत स्थानिक नेत्यांना आवाहन करण्यात आले हाेते. काही ठिकाणी यश आले. पुसेगाव या मोठ्या ग्रामपंचायतीत भाजपला रोखण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढत आहेत.
- डॉ. सुरेश जाधव,
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
शिवसेनेची जिथे ताकद आहे, अशा ठिकाणी स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. मात्र भाजपला बाजूला ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत आघाडी केलेली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेचे सदस्य बिनविरोध निवडले आहेत. आगामी काळातदेखील तिन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढतील.
- चंद्रकांत जाधव,
जिल्हाध्यक्ष, शिवसेना
राज्याच्या विधानसभेत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्थानिक गट-तट असतात. एकाच पक्षाचे दोन गट एकमेकांपुढे उभे राहतात. यंदाही तसे झाले असल्याचे दिसते.
- सुनील माने,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
त्वेषाने लढून नंतर आघाडी
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आमदार विशेषत: लक्ष घालत नाहीत. मात्र ज्या ठिकाणी आपला गट कमकुवत होतोय, असे वाटल्यास आमदार स्वत: मैदानात उतरतात. मात्र, आपलेच कार्यकर्ते जर एकमेकांच्या विरोधात असतील, तर मात्र आमदार लक्ष घालत नाहीत. निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या राजकारणात विशेष लक्ष दिले जाते. विरोधकांचे कमकुवत दुवे ओळखून आघाड्या होतात.