लोणंद : लोणंद नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी पाहावयास मिळाल्या. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे १, काँग्रेसच्या वतीने १ व राष्ट्रवादीच्याच नगरसेविकेने काँग्रेसला सोबत घेत १ असे एकूण ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दाखल अर्जाला अनुमोदकाची खोटी सही असल्याचा दावा करत तक्रारी अर्ज दाखल झाला. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी संबंधित तक्रारी अर्ज फेटाळून लावला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीच्याही नगरसेविकेनेही तक्रारी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. लोणंदच्या नगराध्यक्षपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अर्ज दाखल प्रक्रिया सुरू होताच ६ उमेदवारांनी प्रत्येकी २ असे १२ उमेदवारी अर्ज घेतले. काँग्रेसकडून स्वाती शरद भंडलकर, विकास लुमा केदारी, हेमलता रमेश कर्णवर व राष्ट्रवादीकडून कुसुम विश्वास शिरतोडे, दीपाली रवींद्र क्षीरसागर, स्नेहलता आनंदराव शेळके-पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतले. मात्र, हे होताना काँग्रेसतर्फे स्वाती भंडलकर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्नेहलता शेळके-पाटील यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीच्याच असणाऱ्या दीपाली क्षीरसागर यांनी घड्याळाची साथ सोडत काँग्रेसचा हात सोबत घेत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. एकंदरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार स्नेहलता शेळके-पाटील यांना विरोध करत राष्ट्रवादीच्याच दीपाली क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीमध्ये बंडाळी होत काँग्रेसला सत्तेची दारे खुली झाली आहेत. त्यामध्ये दीपाली क्षीरसागर यांना नाट्यमयरीत्या काँग्रेसच्या नगरसेविका असणाऱ्या हेमलता कर्णवर यांनी सूचक म्हणून तर अनुमोदक म्हणून अॅड. पुरुषोत्तम हिंगमिरे यांनी सह्या केल्याने राजकीय समीकरणेच बदलून गेली आहेत. काँग्रेसच्या उमेदवार स्वाती भंडलकर यांना शैला बाळासाहेब खरात या सूचक तर विकास लुमा केदारी हे अनुमोदक आहेत. तर राष्ट्रवादीच्या स्नेहलता शेळके-पाटील यांना सूचक म्हणून मेघा अप्पासो शेळके व अनुमोदक म्हणून अपक्ष नगरसेवक सचिन नानाजी शेळके यांनी सह्या केल्या आहेत. यापैकी काँग्रेसच्या उमेदवार स्वाती भंडलकर व राष्ट्रवादीच्या दीपाली क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार स्नेहलता शेळके-पाटील यांचे अनुमोदक सचिन नानाजी शेळके हे याठिकाणी उपस्थित नसल्याचे सांगत खोटी सही उमेदवारी अर्जावर केली असल्याचा दावा करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना २ तक्रारी अर्ज दिले. यामुळे काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी अस्मिता मोरे यांनी संबंधित तक्रारी अर्ज निकाली काढला. संबंधित तक्रारदारांना ४८ तासांच्या आत अपील दाखल करावयाचे असल्यास पुणे येथील विभागीय आयुक्त तथा नगररचना विभाग संचालक यांच्याकडे दाखल करण्याच्या लेखी सूचना दिल्या. एकूणच लोणंद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय समीकरणाला मोठ्या प्रमाणात वेग आला असून, यामध्ये बाजी कोण मारणार हे बुधवारीच स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)
नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीला ‘काँग्रेसचा हात’
By admin | Published: May 01, 2016 12:08 AM