पाटण : ‘शिवसेना हा खंडणी बहाद्दरांचा पक्ष आहे. मुंबई महापालिकेत त्यांची ‘अलीबाबा आणि चाळीस चोर,’ अशी स्थिती आहे. यातूनच संबंधितांकडून विकास साधला जातो. सेनेच्या सातारा लोकसभेच्या उमेदवारांच्या मिशा या राष्ट्रवादीने त्यांना मोठे केल्यानेच पीळदार झाल्या आहेत. मात्र, सातत्याने पक्ष बदलून मुख्यमंत्र्यांच्या मागे धावणारे लोकप्रतिनिधी साताऱ्याची जनता कदापिही स्वीकारणार नाही,’ अशी टीका राष्ट्रवादीच्या माजी प्रदेशाध्यक्षा आमदार विद्या चव्हाण यांनी केली.राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पाटण येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रीय सचिव सोनल वसईकर, जिल्हाध्यक्षा समिंद्र्रा जाधव, सुरेखा पाटील, पंचायत समितीच्या सभापती उज्ज्वला जाधव, नगराध्यक्षा सुषमा महाजन, डॉ. चंद्र्रशेखर घोरपडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या, ‘भाजप आणि शिवसेना हा पक्ष भांडणे, मारामारी करणारे पक्ष आहेत. सेनेचे उद्धव ठाकरे हे अमित शहांना अफझल खान म्हणाले आणि सत्तेसाठी पुन्हा त्यांचेच पाय पकडत आहेत. त्यामुळे आता शिवसेनेने आपल्यातील ‘शिव’ काढून टाकावा जेणेकरून यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होणार नाही. अच्छे दिनाची गाजरे नरेंद्र मोदी यांनी दाखवली; पण पदरात काहीच पडले नाही. येथे महिला, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी यांच्यासह सर्वांचेच वाटोळे झाले. त्यामुळे आता यांना धडा शिकवला पाहिजे म्हणून प्रत्येकानेच पेटून उठा आणि ही सत्ता उलथून टाकून देशात आपल्या विचारांचे शासन आणा.’सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, ‘मोदी सरकारने केलेला अन्यायाची व्याजासकट परतफेड करण्याची संधी या लोकसभा निवडणुकीत मिळाली आहे. ही निवडणूक गल्लीबोळातील नसून ती देशाचे भवितव्य ठरवणारी आहे.’यावेळी महिलाध्यक्षा स्नेहल जाधव, रेखा पाटील, संगीता पुजारी, शोभा कदम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे आदींसह विविध पदाधिकारी महिलांची उपस्थिती लक्ष्यनीय होती. शोभा कदम यांनी स्वागत केले. प्रदर्शन स्नेहल जाधव यांनी आभार मानले.
Lok Sabha Election 2019 राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे केल्यानेच मिशा पीळदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:56 PM