अजित पवारांच्या मनाचा मोठेपणा! अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले दादा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 09:41 AM2018-05-09T09:41:27+5:302018-05-09T10:00:12+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार महाबळेश्वरहून परतत असताना एका जखमी व्यक्तीच्या मदतीला धावून गेले.
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार महाबळेश्वरहून परतत असताना एका जखमी व्यक्तीच्या मदतीला धावून गेले. महाबळेश्वर-पाचगणी घाटात मंगळवारी (8 मे) रात्री उशिरा अपघात झाला. याचदरम्यान, अजित पवार महाबळेश्वरवरुन परतत होते व रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या जखमी व्यक्तीला पाहून त्यांनी आपली गाडी थांबवली. क्षणाचाही विचार न करता त्यांनी जखमीला आपल्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अजित पवारांनी दाखवलेल्या माणुसकीचे व प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर-वाई- सातारा मार्गावर संतोष बजरंग जाधव या तरुणाच्या बाईकला अपघात झाला. रानडुक्करानं अचानक धडक दिल्याने तो बाईकवरुन पडला. यावेळी जाधव मदतीच्या अपेक्षेपोटी तसाच बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडून होता. याच मार्गावरुन अजित पवार महाबळेश्वरमधील एक विवाह सोहळा आटपून परतत होते. यावेळी त्यांना संतोष बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आपली गाडी थांबवली व संतोष जाधवच्या मदतीसाठी ते आपल्या कार्यकर्त्यांसहीत धावले.
यावेळी पक्षाचे कार्यकर्ते रविराज तावरे लाखे आणि अजित पवारांचे स्वीय सहायक सुनील मुसळे यांनी जखमीला गाडीमध्ये बसवून साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली व डॉक्टरांना संपर्क करुन जखमीच्या तब्येतीची खबरदारी घेण्याबाबत विशेष सूचनादेखील दिल्या. अजित पवारांनी दाखवलेल्या या मनाच्या मोठेपणाचं सर्वत्र कौतुक केले जात आहे.