सातारा : जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाच्या कारभाराच्या नाड्या ज्या दोन नेत्यांकडे आहेत, त्यांनी आदेश देऊनही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाला बुधवारीही कोलदांडा दाखविला. येत्या दोन दिवसांत यावर निश्चित तोडगा निघून पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे राज्याचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचे आदेश दिले होते. ज्यांना पद मिळाले नाही, त्यांना संधी देण्याच्या सूचनाही केल्या होत्या. राष्ट्रवादी पक्षाचा जिल्ह्याचा कारभार पाहणारे विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार शशिकांत शिंदे यांनी याबाबत तोंडी आदेश देऊनही याबाबतची कार्यवाही झालेली नाही. पदाधिकाऱ्यांमधील इच्छुकांच्या आकांक्षांना अधिकच पंख फुटल्याचे चित्र आता पुढे आले आहे. ज्यांना याआधी पदे मिळाली आहेत, तेच पुन्हा नव्याने इच्छुकांच्या रांगेत उभे असल्याने राजकीय कोंडी होऊन बसली आहे. माण तालुक्यात राष्ट्रवादीला उतरती कळा लागली असल्याने याठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देऊन बेरजेचे राजकारण करण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवरून सुरू असतानाच स्थानिक पातळीवर मात्र पदांचा खो-खो सुरू असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी) पदाधिकारी फिरकलेच नाहीत...! राष्ट्रवादी भवनात बुधवारी सकाळी अपेक्षेप्रमाणे रेलचेल सुरू होती. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील व जिल्हा युवक अध्यक्ष अॅड. नितीन भोसले कार्यालयात उपस्थित होते. नेहमीप्रमाणे काही कार्यकर्तेही जा-ये करत होते. मात्र, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी या कार्यालयाकडे फिरकलेच नाही. जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याशी संपर्क साधला असता तेही साताऱ्याबाहेरच होते. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या नेत्यांनी राजीनामे सादर करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. बुधवारी माझ्याकडे हे राजीनामे सादर होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप एकाही पदाधिकाऱ्याने आपला राजीनामा सादर केलेला नाही. - सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
राष्ट्रवादी नेत्यांच्या आदेशाला कोलदांडा!
By admin | Published: January 13, 2016 10:27 PM