खंडाळा : तालुक्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विविध पक्षांच्या स्थानिक पातळीवरील पॅनलने प्रचाराचा धुरळा उडवला होता. काँग्रेसने तीन, भाजप व शिवसेनेने प्रत्येकी एक व इतर दोन ठिकाणी स्थानिक आघाडीने वर्चस्व राखले. उर्वरित ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. बहुतांश ग्रामपंचायतींत राष्ट्रवादी पक्षांतर्गतच पॅनलमध्ये लढत दिसली. त्यामुळे खंडाळा तालुक्यात राष्ट्रवादीच जिंकली अन् राष्ट्रवादीच हरली, अशी स्थिती राहिली आहे.
तालुक्यात झालेल्या ५७ ग्रामपंचायतींपैकी जवळपास ५० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व राखले आहे. मात्र, काही ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने लढल्याने मोठी चुरस निर्माण झाली. खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटात सदस्य मनोज पवार यांच्या गटाला नागेश्वर पॅनलने झुंजवले असले तरी बावडा येथे निसटता विजय मिळवून राष्ट्रवादीचा गड राखला. पारगाव येथे पंचायत समिती सदस्या अश्विनी पवार यांच्या पॅनलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. अहिरे येथे माजी सभापती रमेश धायगुडे यांच्या गटाला आमदार गटाचे नितीन ओव्हाळ यांनी तारल्याने काठावर सत्ता राखता आली. येथे उपसभापती वंदना धायगुडे यांच्या पॅनलने चार जागा मिळवून काँग्रेसला पुन्हा संजीवनी दिली तर बोरी येथे काँग्रेसने सत्ता मिळवली. खेड बुद्रुक येथे नऊ जागा मिळवून राष्ट्रवादीच्या पॅनलने निर्विवाद यश मिळवले, कोपर्डे येथे राज्य बाजार समितीचे संचालक रमेश शिंदे यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला, तर शिवाजीनगर येथे भाजपने सत्ता काबीज केली. मात्र तेथे ‘गड आला; पण सिंह गेला’ अशी स्थिती झाली.
भादे गटात सदस्या दीपाली साळुंखे यांच्या पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले. विरोधी पॅनलने आठ जागा जिंकून सत्ता काबीज केली तर अंदोरी येथील अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या पॅनलने आठ जागा जिंकून तर शेखमीरेवाडी, बाळूपाटलाचीवाडी, वाघोशीत सर्वच जागा जिंकून करिष्मा दाखवला. नायगाव येथे महाविकास आघाडीची सरशी झाली. वाठार बुद्रुक येथे माजी सभापती सुभाष साळुंखे यांना पराभवाचा धक्का बसला, तर उर्वरित सर्वच गावांत राष्ट्रवादीने बाजी मारली.
शिरवळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अजय भोसले यांच्या जवळे येथील पॅनलला अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. पळशी बिनविरोध करून नितीन भरगुडे-पाटील यांनी बाजी मारली होती. विंग, भाटघर, गुठाळे, कवठे, राजेवाडी यांसह परिसरातील गावांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले व सभापती राजेंद्र तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने विजयी घोडदौड कायम राखली. अतीट येथे शिवसेनेने सत्ता काबीज केली. तालुक्याच्या राजकारणात उलथापालथ झाली तरी अखेरची गोळाबेरीज आमदार मकरंद पाटील यांच्याजवळच होत राहते, हा आजवरचा इतिहास ताजा झाला.
चिठ्ठीवर नशीब अजमावले
कोपर्डेत भानुदास ठोंबरे व अभिजीत शिंदे यांना समान ३१५ मते पडल्याने चिठ्ठी काढली. यामध्ये भानुदास ठोंबरे विजयी झाले.
शिंदेवाडी येथे वैशाली सोनावणे व अनिता जाधव यांना समान १९७ मते पडली. येथे चिठ्ठीवर अनिता जाधव विजयी ठरल्या. वडगाव येथे रूपाली खामकर व दीपाली पवार यांना ७१ अशी समान मते पडल्यानंतर चिठ्ठीवर दीपाली पवार विजयी ठरल्या, तर शिवाजीनगर, मोर्वे व म्हावशी येथे एका जागेवरील उमेदवार मतपेटीत विजयी होऊनही पोस्टल मतमोजणीनंतर पराभूत ठरले.