सातारा : आमदार अपात्रता प्रकरणात चालढकल करण्यात येत आहे. हे आमदार अपात्र होणार असल्यानेच असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंतही ही सुनावणी लांबविली जाण्याची शक्यता आहे,’ अशी भीती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे रमेश उबाळे यांनी उपोषण सुरू केले होते. उपोषणकर्त्यांना भेट दिल्यानंतर आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या मुदतीत अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पण, न्यायालयाचा आदेश गांभीर्याने घेतला जात नाही. सत्ताधारी आणि अध्यक्ष सुनावणीला विलंब लावून विनाकारण चालढकल करत आहेत. तसेच ही बाब न्यायालयानेही गांभीर्याने घेतल्यानंतर त्यांनी अध्यक्षांना सूचना केली आहे. आता सरकारमधील आमदार अपात्र होणार हे कायद्याने निश्चित झालेलेच आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही याबाबत निर्णय दिला जात नाही. त्यामुळे आता न्यायालयानेच निर्णय घेण्याची गरज आहे.अध्यक्षांचा अधिकार असूनही चालढकल दिसून येत आहे. आता प्रत्येक आमदाराला स्वतंत्रपणाने बोलवायचे म्हणजे यात दोन-तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत ही सुनावणी लांबवली जाण्याची शक्यता आहे, असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीसंदर्भात आमदार शिंदे यांनी मार्च, एप्रिलपर्यंत लोकसभा निवडणूक आहे. पण, डिसेंबर, जानेवारीपर्यंत म्हणजे मुदतीच्या आत ही निवडणूक घेतली जाईल, असा अंदाजही वर्तविला.
..म्हणूनच चालढकल, आमदार अपात्र सुनावणीवर शशिकांत शिंदेंनी व्यक्त केलं मत
By नितीन काळेल | Published: September 21, 2023 6:32 PM