कऱ्हाड : कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृह उभारण्यात, त्याला निधी देण्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही मोलाचा सहभाग आहे. पण पृथ्वीराज चव्हाण त्यांचा उल्लेखही करीत नाहीत. शिवाय राज्यातील सध्याचे सरकार घटनाबाह्य आहे असे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात; मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकास कामांची उद्घाटनं कसे काय करता? असा सवाल कराड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहाच्या उद्घाटनास त्या इमारतीस निधी देण्यात मोलाचे योगदान असणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. याचा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आम्ही निषेध करीत आहोत.वास्तविक कऱ्हाडचे शासकीय विश्रामगृह उभारणीत अजित पवार व जिल्ह्यातील सर्व आमदारांचे सहकार्य लाभले आहे. २५ नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कऱ्हाडला दिवंगत यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी निमित्त स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. त्याच वेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विश्रामगृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते घेतले आहे. पण अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही ही बाब चुकीची आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एका बाजूला राज्यातील सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे असे ठासून सांगतात. आणि त्याच घटनाबाह्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांची उद्घाटने, भूमिपूजन घेतात ही बाब न पटणारी आहे. राज्यात आजही महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. असे असताना चुकीच्या पद्धतीने कार्यक्रम करणे निषेधार्य आहे असेही यादव यांनी म्हटले आहे.
..मग मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांची उद्घाटनं कसे करता?, राष्ट्रवादीच्या नेत्याचा पृथ्वीराज चव्हाणांना सवाल
By प्रमोद सुकरे | Published: November 24, 2022 4:21 PM