सातारा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कदम सध्या धीम्या गतीनेच पडत आहेत. पक्षाचे प्रवक्ते शशिकांत शिंदे जिल्ह्यातील लोकांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असले तरी सातारा तालुक्यात फारशी राजकीय ताकद लावण्याचा त्यांचा इरादा दिसत नाही. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेससोबत येतील, अशी भाबडी आशा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोडलेली नाही. त्यामुळे त्यांना नाराज करुन साताऱ्यात त्यांच्याशिवाय राजकीय ताकद वाढविण्याच्या फंदात सध्यातरी राष्ट्रवादी पडताना दिसत नाही. त्यामुळे इतर पक्षांनी आपली राजकीय ताकद वाढविण्यास सुरुवात केली असून, भविष्यात त्याचा राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापनेपासून सातारा जिल्हा आणि तालुक्यावर आपला पगडा कायम ठेवला होता. स्थापनेपासून सातारा तालुक्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायमस्वरुपी आहे. पण, यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पक्षबदल केल्यामुळे ही जागा भाजपकडे गेली. सातारा आणि जावळी या तालुक्यांत शिवेंद्रराजेंनी आपली मोठी ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे याठिकाणी इतर कोणालाही सहज राजकीय ताकद वाढवता येणार नाही. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद वाढविण्याची आवश्यकता होती. पण, आज ना उद्या शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्यासोबतच येतील, अशी आशा स्थानिक नेत्यांसह राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनाही असल्यामुळे त्यांनी सातारा तालुक्यात फारसे लक्ष दिलेले नाही. याचा फायदा आता इतर पक्ष घेऊ लागले आहेत. ज्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय इतर कोणालाही पाय ठेवता येत नव्हता त्याठिकाणी आता राष्ट्रवादीची पोकळी भरुन काढण्याचे काम शिवसेनेच्यावतीने सुरु झाले आहे.
दरडी कोसळणे आणि कोसळण्याची शक्यता असलेल्या गावांसाठी त्याबरोबरच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांपर्यंत शिवेंद्रसिंहराजे पहिल्यांदा पोहोचले. पण, त्यांच्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी ही संधी सोडली नाही. तालुक्यातील लोकांचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेते आणि मंत्री महोदयांशी असलेल्या संबंधांमुळे थेट मुंबईतून मदत गावातील लोकांपर्यंत पोहोचली आहे. कोण मदत करतो, कशासाठी करतो याबाबत मदत घेणाऱ्यांमध्ये तेवढी सजगता नसली तरीदेखील एक वेगळे वातावरण तयार होऊन राजकीय पोकळी भरुन काढण्याचे काम सुरु आहे.
शिवसेनेकडून राष्ट्रवादीची पोकळी भरुन काढण्याचे नियोजन
शिवसेनेने अनेक तालुक्यांमध्ये सध्या आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले आहे. यापूर्वी अशा गोष्टी होत नव्हत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांना कामासाठी मर्यादा येत होत्या. केवळ आंदोलने आणि विरोध यापुरतेच शिवसेनेचे अस्तित्व मर्यादीत राहत होते. पण, सध्या परिस्थिती बदललेली आहे. नेत्यांनी स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे कार्यकर्ते आता गावोगावी पोहोचत आहेत. यापूर्वी केवळ शिवेंद्रसिंहराजे आहेत आणि त्यांना डावलून पुढे जायचे नाही, असा अनेकांचा दंडक असल्यामुळे कोणीही तालुक्यात फारसे लक्ष घालत नव्हते. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसची पोकळीच भरुन काढण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस लवकर जागी झाली नाही तर भविष्यात तालुक्यात अनेक राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीने का केले दुर्लक्ष
राष्ट्रवादीने सातारा तालुक्याकडे दुर्लक्षच केले आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये गेले असले तरी त्यांचे कार्यकर्ते अजूनही मनाने आणि अस्तित्वाने राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहेत. ते राष्ट्रवादीलाही सोडत नाहीत आणि शिवेंद्रसिंहराजेंनाही सोडत नाहीत. अशीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसचीही झाली आहे. त्यांना पक्षालाही ताकद द्यायची नाही आणि शिवेंद्रसिंहराजेेंनाही नाराज करायचे नाही. पण, यामुळे भविष्यात होणाऱ्या गुंतागुंतीला स्वत: पक्षच जबाबदार असणार आहे.
कार्यकर्ते काय म्हणतात...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले अनेक कार्यकर्ते आजही शिवेंद्रसिंहराजेंसोबतच आहेत. त्यांनी पक्षाच्या कोणत्याही पदाचा राजीनामा दिलेला नाही किंवा पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिलेला नाही. ते पक्षासोबत आणि राजेंसोबत असे दोन्ही ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जायचे नसले तरी राजेंसोबत राहायचे आहे. त्यामुळे नेमकी काय भूमिका घ्यावी, असा प्रश्न राष्ट्रवादी, कार्यकर्ते आणि नेत्यांनाही पडला आहे.