लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक गावांमध्ये भाजपने मुसंडी मारत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घराच्या अंगणात दिवाळीचा किल्ला तयार करण्यात गुंतले होते. विशेष म्हणजे, ‘राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील जिल्हाध्यक्षांचा हा बालकिल्ला’ सोशल मीडियावर झळकला आहे.गेल्या दीड दशकांपासून सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी जिल्हाध्यक्षपदाच्या काळात पक्षाला अधिकाधिक उर्जितावस्था आणली. त्यानंतर डॉ. दिलीप येळगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जिल्हाध्यक्षाला व्यवस्थित काम करु देत नाहीत, स्वातंत्र्य अन् अधिकार देत नाहीत, अशी टीकाही केली गेली.येळगावकर भाजपमध्ये गेल्यानंतर रहिमतपूरचे सुनील माने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष झाले. त्यांच्या काळात जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या राष्ट्रवादीच्याच ताब्यात आल्या. जिल्हा परिषदेची सत्ताही अबाधित राहिली.मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील ५० पेक्षाही जास्त गावांमध्ये भाजपने आपला झेंडा फडकाविल्याचा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केला. १०० पेक्षाही जास्त ठिकाणी राष्ट्रवादीचीच सत्ता आली असली तरी भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीसाठी आत्मचिंतनाची अन् चिंतेची बाब ठरली.इतकी वर्षे जिल्ह्यात काँग्रेस हाच राष्ट्रवादीचा प्रमुख विरोधक होता. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पाहता भविष्यात भाजपची डोकेदुखी राष्ट्रवादीसाठी अत्यंत त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.अशा वेळी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट करणे गरजेचे असताना घरात किल्ला बांधताना त्यांचा फोटो सोशल मीडियावर फिरु लागला आहे. खरं तर, संपूर्ण पक्षाची धुरा सांभाळणारा एक जिल्हाध्यक्ष आपलं मोठेपण उंबरठ्याबाहेर ठेवून लहान मुलांमध्ये सर्वसामान्यांसारखा वावरतो, ही कौतुकाचीच गोष्ट. मात्र, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला टिकावायचा असेल तर हा बालकिल्ला किती उपयोगाचा, याची चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात जिल्हाध्यक्षांचा ‘बालकिल्ला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:51 PM