आनंद गाडगीळमेढा : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जावळी तालुका पंचायत समितीवर निर्विवाद राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरीही सदस्य हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणारे आहेत. बदलत्या राजकारणात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपचे आमदार झाल्याने जावळी पंचायत समितीवर झेंडा जरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असला तरीही झेंड्याची काठी मात्र भाजपच्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हाती असल्याचे चित्र आहे.
जावळी पंचायत समितीमध्ये ६ सदस्य असून सर्वच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. सध्या असणाऱ्या जावळी पंचायत समितीच्या सभापती जयश्री गिरी व त्यांचे पती माजी सभापती सुहास गिरी हे दोघेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आहेत. जावळी पंचायत समितीच्या एकूण सहा गणात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणारे सदस्य असले तरीही कुडाळ भागात माजी आमदार शशिकांत शिंदे यांना मानणारा एक मोठ्ठा गट आहे. सध्या या दोन्ही गटाचे असलेले पंचायत समिती सदस्य गुण्या गोविंदाने नांदत आहेत, मात्र आगामी काळात या सदस्यांची भूमिका ही पक्षनिष्ठा कि नेता निष्ठा यावरच राजकारणाची दिशा स्पष्ट करणारी ठरणार आहे.
तालुक्यात माजी आमदार सदाशिव सपकाळ यांचा कार्यकाळ वगळता राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीसह सहकार क्षेत्रात कायम वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आज देखील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला झालेले मतदान पाहता तालुक्यात आगामी काळात होणारी कोणतीही निवडणूक ही दोन गटात झाली तरी अन दोन पक्षात झाली तरी अटीतटीची होणार हे मात्र नक्की.