सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे पुणे लोकसभा मतदारसंघात पुनर्वसन करून पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादावर कायमचा पडदा टाकण्याच्या हालचाली राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहेत. भाजपला खिंडीत गाठण्यासाठी राष्ट्रवादीने वेगळाच ‘गेम प्लॅन’ आखल्याची जोरदार चर्चा पुणे व सातारा जिल्ह्यात सुरू आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे पुणे मतदारसंघात पुनर्वसन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात नाही, ही सल खासदार शरद पवार यांना आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना संधी द्यायची आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या रुपाने पुण्यावरही पकड मिळवायची, अशी दुहेरी खेळी करण्यासाठी खासदार पवार उत्सुक असल्याची चर्चा आहे. या नव्या क्रांतिकारी बदलाची अंमलबजावणी करण्यासाठी मैदान तयार करण्यावर खा. पवार यांनी भर दिला आहे.पुणे लोकसभा मतदारसंघात दरवेळी काँगे्रस-भाजप यांच्यातच घमासान संघर्ष होतो. तीनवेळा टकरा दिल्यानंतर मागील निवडणुकीत भाजपच्या अनिल शिरोळे यांना तेथील जनतेने संधी दिली. काँगे्रसचे उमेदवार आमदार विश्वजित कदम यांचा २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत पराभव झाला होता.विश्वजित कदम पलूस-कडेगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. साहजिकच, काँगे्रसला पुण्यात उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. या परिस्थितीत भाजपचा उधळलेला वारू रोखण्यासाठी सारिपाटावरील सोंगट्यांच्या अदलाबदलीचा निर्णय सत्यात उतरवून पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी खासदार पवारांनी सैन्य सज्ज ठेवले आहे.सातारा लोकसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाची स्थापना १९९९ मध्ये झाली. त्यानंतर राष्ट्रवादीने जिल्ह्यातील सर्वच सत्तास्थाने आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यात पुढील काळात निश्चित यश आले आहे. यामुळे सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला.आता याच बालेकिल्ल्यात पक्षांतर्गत संघर्ष सुरू आहे, त्यातच भाजपच्या नेत्यांची महत्त्वकांक्षा वाढली असल्याने राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे नेतृत्व अधिक सावध झाले आहे. ‘खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी विरोधकांचा पाठिंबा आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांचा विरोध,’ असे चित्र पाहायला मिळते.या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघात नाराजीचे वावटळ पक्षाला धोकादायक ठरू शकते. लोकसभा निवडणुकीत पक्षांतर्गत संघर्षाचा फायदा इतर पक्षाला होण्याची भीती मोठी आहे.जिल्ह्यातील स्वपक्षाच्या आमदारांचा असलेला विरोध लक्षात घेऊन पुणे मतदारसंघातही वलय असणाºया खासदार उदयनराजे भोसले यांना पुणे लोकसभा मतदारसंघात उभे करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेतृत्व उत्सुक आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती झाली नाही तर सातारा लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उभे करणार, हे लक्षात घेऊन सातारा व पुणे दोन्हीकडे भाजपला शह देण्याची व्यूहरचना खा. पवारांनी आखल्याची चर्चा आहे.खासदार-आमदार संघर्षाला बगलउदयनराजेंना पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देऊन अनेक गोष्टी साध्य केल्या जाऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले आपल्या विरोधकांना मदत करतील, अशी भीती राष्ट्रवादीच्या आमदारांना आहे. ती दूर होऊन पक्षांतर्गत संघर्षाला बगल देता येईल.अधिकचा एक मतदारसंघ पदरात पडेलराष्ट्रवादी काँगे्रसकडे सातारा (उदयनराजे भोसले), माढा (विजयसिंह मोहिते-पाटील), कोल्हापूर (धनंजय महाडिक), भंडारा-गोंदिया (मधुकरराव कुकडे), लक्षद्वीप (पी. पी. महमद फैजल), बारामती (सुप्रिया सुळे), कटिहार (बिहार) (तारिक अन्वर) हे सात मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वलयाचा फायदा घेऊन पुणे हा अधिकचा लोकसभा मतदारसंघ आपल्या अधिपत्याखाली आणून लोकसभेतील ताकद वाढविण्यावर पक्षाचा भर राहणार आहे.पक्षाच्या बैठकीत होणार चर्चाराष्ट्रवादी काँगे्रसची मुंबईतील पक्ष कार्यालयात रविवार, दि. ७ आॅक्टोबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीची प्रमुख मंडळी उपस्थित राहणार आहेत. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले व खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह प्रमुख नेतेमंडळी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बारामतीत आमदारांशी झालेली चर्चा व त्याच दिवशी पुण्यात उदयनराजेंशी झालेली बोलणी याला मूर्तरूप आणण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.पुणे मतदारसंघातील स्थितीपुणे लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँगे्रस अशीच लढत झालेली आहे. १९९९ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपकडे गेला. २००४ व २००९ च्या निवडणुकांत हा मतदारसंघ काँगे्रसने हिसकावून घेतला. तर २०१४ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ दहा वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा भाजपकडे गेला आहे. १९९९ मध्ये भाजपचे प्रदीप राऊत निवडून आले होते. २००४ व २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँगे्रसचे सुरेश कलमाडी यांनी भाजपच्या अनिल शिरोळे यांचा पराभव केला होता. तर २०१४ च्या निवडणुकीत तिसºयांदा लढत देऊन भाजपचे अनिल शिरोळे खासदार झाले. काँगे्रसचे विश्वजित कदम यांचा त्यांनी पराभव केला होता.
भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचा ‘गेम प्लॅन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 11:10 PM