कोपर्डे हवेली : तालुक्यातील कोपर्डे हवेली हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखले जाते. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी पारंपरिक लढत झाली. अटीतटीच्या या लढतीत राष्ट्रवादीला सत्ता कायम राखण्यात यश आले. राष्ट्रवादीने सत्तेची हॅटट्रीक साधली. तर काँग्रेसला थोड्या मताच्या फरकाने सत्तेपासून दूर रहावे लागले.
राष्ट्रवादीच्या पॅनेलचे नेतृत्व सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण व माजी संचालक बळवंतराव चव्हाण यांनी केले. तर काँग्रेसच्या पॅनेलचे नेतृत्व बाजार समितीचे माजी सभापती हिंदूराव चव्हाण आणि कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण यांनी केले. कोपर्डे हवेलीत ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून गेले होते. दोन्ही गटांनी सत्तेसाठी जय्यत तयारी केली होती. तसेच उमेदवारही सरस देण्यात आल्यामुळे निवडणुकीत रंग भरणार, हे दिसून येत होते. अखेर ही लढाई अटीतटीचीच झाल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट होते.
या अटीतटीच्या लढतीत विरोधी काँग्रेसचा एक उमेदवार एका मताने पराभूत झाल्यामुळे सत्तांतराची संधी हुकली आणि सत्ताधारी गटाला सत्ता राखण्यात यश आले. प्रभाग एकमध्ये राष्ट्रवादीने आपले वर्चस्व राखले. तर प्रभाग दोनमध्ये कॉंग्रेसने बालेकिल्ला राखला. प्रभाग तीन, चार व पाचमध्ये अटीतटीची लढत पहायला मिळाली. या तिन्ही प्रभागात मतदारांनी कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने कौल दिला नाही. त्यामुळे या तिन्ही प्रभागात फुटून उमेदवार विजयी झाले. प्रभाग तीनमधील विरोधकांचा एक उमेदवार केवळ एका मताने पराभूत झाला. त्यामुळे विरोधकांना सत्तेवर पाणी सोडावे लागले.
- चौकट
वेगवेगळ्या प्रभागातून तीनवेळा विजय
गत तीन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये डी. एस. काशीद हे उमेदवार वेगवेगळ्या प्रभागातून निवडून येत आहेत. यावेळेसही त्यांचा विजय झाला. यापूर्वी प्रभाग २, त्यानंतर प्रभाग ४ आणि आता प्रभाग ५ मधून ते निवडून आले आहेत.