आदर्की : फलटण पश्चिम भागातील हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये राजे विरुद्ध राजे अशी अवस्था राष्ट्रवादीची झाल्यामुळे काँग्रेसचे वर्चस्व वाढले असल्याचे लक्षात येताच काँग्रेसला थोपविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेतेच प्रचारासाठी गावात आल्याने प्रचारात चुरस वाढली आहे.फलटण तालुक्याच्या पश्चिम भागावर दिवंगत चिमणराव कदम, प्रल्हादराव साळुंखे-पाटील गटाचे वर्चस्व होते. परंतु, धोम-बलकवडी पाण्यामुळे वर्चस्व कमी झाले होते. परंतु, गत तीन वर्षांपासून प्रत्येक गावात राजे विरुद्ध राजे अशी अवस्था राष्ट्रवादीची झाली आहे.त्यामुळे राष्ट्रवादीची निष्ठावंत फळी नाराज झाली आहे. त्याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकांवर होऊन राजे गटाच्या कार्यकर्त्यांची काँग्रेसच्या उमेदवारांबरोबर युती करण्याचे प्रकार वाघोशी, कोऱ्हाळे, बिबी, आनंदगाव येथे झाल्याने राजे विरुद्ध राजे अशी लढत होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसचे वर्चस्व वाढणार आहे.याचा परिणाम तालुक्याच्या राजकारणावर होऊ नये म्हणून संजीवराजे निंबाळकर-निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी प्रचाराचे नारळ फोडून राष्ट्रवादीचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. कोऱ्हाळे येथे काँग्रेसचे तीन उमेदवार बिनविरोध आले आहेत. घाडगेवाडी येथे पाच उमेदवारांत चुरशीची लढत होत आहे. (वार्ताहर)
राष्ट्रवादीचे नेते तळ ठोकून
By admin | Published: August 02, 2015 10:05 PM