रशीद शेख ल्ल औंधनगरपंचायत निवडणुकांचा धुरळा बसतोय ना बसतोय तोपर्यंत जिल्हा परिषद गटातील वातावरण तापू लागल्याचे चित्र औंध गटात दिसत असून राष्ट्रवादी, काँग्रेस, महायुती अशी तिरंगी लढत निश्चित मानली जात आहे.औंध गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असला तरी गट, गण पुनर्रचनेमुळे तितका सोपा नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. राष्ट्रवादीचे गेल्या दीड दशकापासून या गटावर वर्चस्व आहे तसेच काँग्रेसच्या दोन पंचायत समिती सदस्यांचा याच गटात समावेश झाल्याने काँग्रेस कार्यकर्ते औंध गटात खाते उघडण्याच्या तयारीत आहे तर राज्यात महायुती सत्तेवर असल्याने औंध गटात परिवर्तन करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावल्याचे सांगितले जात आहे. आरक्षण सोडत होताच औंध गटात इच्छुकांनी आपले दौरे वाढविले आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांत आवर्जून हजेरी लावत आहेत. वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. औंध गण व कुरोली गणात इच्छुकांची मांदियाळी असल्याची स्थिती सध्या पाहावयास मिळत आहे तर औंध जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने तिथे मात्र बोटावर मोजण्याइतकेच इच्छुक रिंगणात उतरणार असल्याचे चित्र सध्या तरी पाहावयास मिळत आहे.औंध गणात राष्ट्रवादीकडून राजेंद्र माने, पिंटू ऊर्फ संदीप मांडवे, भोसरेचे सरपंच महादेव जाधव, रमेश जगदाळे, नवल थोरात, काँग्रेसकडून भोसरेचे संतोष जाधव, शिवसेनेकडून बाबा ऊर्फ वसंतराव गोसावी, पै. विकास जाधव, भाजपाकडून राजाभाऊ देशमुख, संदीप इंगळे, नवनाथ देशमुख, शेखर गोरे प्रतिष्ठानचे गणेश चव्हाण, संतोष भोसले व औंधचे सागर जगदाळे, जायगावचे पापा ऊर्फ बाळासाहेब पाटील तर सिद्धेश्वर कुरोली गणात गोपूजच्या प्रा. भक्ती संतोष जाधव, कुरोलीच्या प्रमिला पाटोळे, अर्चना बनसोडे तसेच कुरोलीतील आण्णा हिरवे व डॉ. सुजीत ननावरे यांच्या घरातील महिलांची उमेदवारी निघण्याची शक्यता आहे. गुरसाळेच्या विमल वाघ, आशा खटावकर या सुद्धा स्पर्धेत असून, सिद्धेश्वर कुरोली गणात समाविष्ट झालेल्या मोठ्या मतदानाच्या अंबवडे गावातून या सर्व पक्षांची उमेदवार शोध मोहीम सुरू आहे.औंध गट राखीव झाल्याने या ठिकाणी गोपूजचे सत्यवान कमाने, येळीवचे शिवाजीराव सर्वगोड हे सातत्याने लोकसंपर्कात असून, दोघेही पक्षीय तिकीट मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत तर अंबवडेचे सुनील नेटके हे तिकीट मिळविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे. गुरसाळेचे डॉ. बाळासाहेब झेंडे व सिद्धेश्वर कुरोलीचे माजी सरपंच दिलीप साठे ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. सर्वच पक्षांकडून चाचपणी सुरूगेल्या अनेक वर्षांपासून औंध गटात राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने बरेचशे इच्छुक राष्ट्रवादीचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.प्रत्येक पक्षाचे नेते भेटायला जाणाऱ्या इच्छुकास काम सुरू ठेवा, गटात फिरा असा सल्ला देत आहे. औंध गटातील उमेदवारी नेमकी कोणाला दिल्यावर आपल्या पक्षाचा राजकीय फायदा कोणाकडून जास्त होईल, कोणाचा जनसंपर्क किती व कसा आहे याची चाचपणी सर्वच पक्षांकडून सुरू असून, अधिकृत पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादीची प्रतिष्ठा.. काँग्रेसची परीक्षा !
By admin | Published: December 21, 2016 11:54 PM