वाई : वाई तालुक्यातील ७६ पैकी १९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ५७ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आपले वर्चस्व कायम ठेवले. एकूण ७६ पैकी ५५ ग्रामपंचायती राष्ट्रवादी, काॅंग्रेस ६, भाजप ४ तर स्थानिक आघाड्यांनी वियजश्री खेचून आणली. भाजपने राष्ट्रवादीच्या ताब्यातील चार ग्रामपंचायतीत विजय मिळवून राष्ट्रवादीला झटका दिला.
बावधन, केंजळ, गुळुंब, शेंदूरजणे, मेणवली, भोगांव, लोहारे, चांदक, खानापूर, सुरूर, व्याजवाडी, कडेगाव, वाहगाव, बोपेगाव, उडतारे, देगांव, कनूर यासह राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतीत यंदाही राष्ट्रवादीने आपला दबदबा कायम ठेवला आहे. तर भाजपने राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या बावधन, ओझर्डे, धोम, पसरणी या ग्रामपंचायतीत जोरदार लढत दिली. या ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवून आणण्यास भाजपला यश आले.
बावधनमध्ये राष्ट्रवादी काठावर पास झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व त्यांच्या शिलेदारांवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. परखंदीमध्ये विराज शिंदेना रोखण्यासाठी राष्ट्रवादी व भाजप एकत्र आली. तरीही संबंधितांना धूळ चारत काॅंग्रेसला घवघवीत यश मिळाले. काॅंग्रेसच्या विराज शिंदे गटाने एकहाती सत्ता मिळवित ९ जागांवर विजय मिळविला. येथे राष्ट्रवादी, भाजपला खातेसुध्दा उघडता आले नाही.
काॅंग्रेसने स्थानिक आघाडीशी हातमिळवणी करीत धावडी, सटालेवाडी, पिराचीवाड मध्ये राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर फेकले. खानापूरमध्ये पूर्वीपासून राष्ट्रवादीची सत्ता असून ती कायम ठेवण्यात माजी सरपंच किरण काळोखे यांना यश आले आहे. या ठिकाणी आमदार मकरंद पाटील गटाने वर्चस्व राखले तर भाजपला दोन जागांवर समाधान मानावे लागले. गुळुंबमध्ये राष्ट्रवादी व भाजपामध्ये ‘काॅंटे की टक्कर’ पहायला मिळाली. येथे राष्ट्रवादीच्या ६ तर भाजपच्या ५ उमेदवारांनी विजय मिळविला.
सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या व संवेदनशील असणाऱ्या वाई तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीला यश आले असून काॅंग्रेसने एका गटातील ग्रामपंचायतीवर आपला वरचष्मा कायम ठेवला. भाजपने प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवर युती करून राष्ट्रवादीला धक्का देण्याचा प्रयत्न केला; परंतु चार ग्रामपंचायती वगळता भाजपला इतर ठिकाणी फारसा प्रभाव पाडता आला नाही.
(चौकट)
तीन उमेदवारांना समान मते
वाई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या भुईंज, पसरणी, ओझर्डे गटाने राष्ट्रवादीला साथ दिली तर बावधन गटाने आमदार मकरंद पाटील यांना विचार करायला भाग पाडले आहे. चांदक ग्रामपंचायतीत एका प्रभागात तीन उमेदवारांना समान मते मिळाली. चिठ्ठीव्दारे घेतलेल्या निकालात राष्ट्रवादी उमेदवाराच्या बाजूने निकाल लागल्याने चांदक गावात राष्ट्रवादीची सरशी झाली.
फोटो : १८ वाई
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सोमवारी वाई तालुक्यात विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. (छाया : पांडुरंग भिलारे)