सातारा : राज्यामध्ये शिवसेनेतील आमदारांनी फुटून स्वतंत्र गट तयार केल्यानंतर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधीलही काही बड्या नेत्यांना गळाला लावले होते. त्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबईत एक बैठकही झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, हाताला फारसे काही लागणार नाही, असा निष्कर्ष निघाल्यानंतर हे बंड काही प्रमाणात थंड झाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव प्राधान्याने घेतले जात होते. मात्र, आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सोशल माध्यमातून सांगितले. स्टेटसवर घड्याळाचे चिन्ह ठेवून कळेल ही आशा असे सूचक शब्द त्यांनी वापरले आहेत.शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी आपला स्वतंत्र गट तयार केला आणि राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रेही ताब्यात घेतली. पक्षनेतृत्वावर हे आमदार नाराज होते आणि जनतेच्या विकासासाठी पुरेसा निधी मिळत नव्हता, असे त्यांनी कारण दिले. मात्र, इकडे ज्यांना अपेक्षेपेक्षा अधिक निधी मिळाला, त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही खदखद सुरू आहे. एकमेकांचे पाय ओढण्यात माहीर असलेल्या या नेत्यांनी आपल्यापेक्षा दुसरा कोणी मोठा होता कामा नये, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. प्रत्येकाने जिल्ह्यात आपलाच दरारा राहावा यासाठी नियोजन केले आहे. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर जिल्हा ताब्यातून जाणार आणि हातात काहीच उरणार नाही, याची जाणीव होऊ लागल्याने या नेत्यांमध्येही चुळबूळ सुरू झाली होती.या अस्वस्थतेतूनच काहींनी भाजपचा रस्ता धरल्याची चर्चा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून होती. रामराजे स्वत: त्यांचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातील इतर नेत्यांनाही सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, रामराजेंना या चर्चांना पूर्णविराम मिळावा, या दृष्टीने काही संकेत दिले आहेत.पक्षाशी बांधीलकी वगैरे गोष्टी आता गौण झाल्या असून, सध्या सत्ता आणि वर्चस्व यांनाच प्राधान्य दिल्याचे दिसते. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवायची आणि कायम सत्तेत कसे राहू, याकडे अधिक कल असल्याने सध्या पक्षांच्या बाबतीत वरिष्ठ नेतेही संधीच्या शोधात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही शरद पवारांचे नेतृत्व मानणारे नेते आहेत. मात्र, दुसऱ्या फळीतील नेत्यांशी त्यांचे फारसे जमेनासे झाले आहे. त्यामुळे योग्य वेळी निर्णय घेण्याच्या तयारीत राष्ट्रवादीतील काही नेते असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
पक्षावर आपल्याच नातलगांची हवी मालकी... हेच नाराजीचे कारणकाँग्रेस, राष्ट्रवादी असो अगर शिवसेना; या पक्षांवर काही ठरावीक प्रमुखांची मालकी आहे. ती सोडण्याची त्यांची इच्छा नाही. त्यामुळे आपल्या घरातीलच कोणीतरी पक्षाची धुरा पुढे सांभाळावी, अशी त्यांची अपेक्षा असते. यातून काही निष्ठावंत नाराज होतात. त्यामुळे पक्षावरच ताबा मिळविण्याचा किंवा स्वतंत्र गट स्थापण्याचा प्रयत्न होतो आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही असाच विचार पुढे येऊ लागला आहे.