अशोक पाटील ।इस्लामपूर : वाळवा तालुक्यात भाजपची पेरणी करण्यासाठी जंबो कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. मात्र यासाठी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नांगरट केली आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीशी मिळतेजुळते घेत भाजपला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे.भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे, युवा नेते गोपीनाथ पडळकर यांच्यासह वाळवा तालुक्याचे नूतन अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी वाळवा तालुक्यात भाजपसाठी तयारी सुरू केली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप आक्रमक झाला आहे. जुन्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल करून नव्या चेहºयांना संधी देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तालुक्याची जंबो कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांचा वाटा मोठा आहे. परंतु त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास कार्यकर्त्यांची उपस्थिती तोकडी दिसत असल्याचा आरोप विरोधकांनी सोशल मीडियावर केला आहे. पुराव्यासाठी गर्दीची छायाचित्रे टाकली आहेत.
शहरात नगरपालिकेतील पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी पहिल्यापासूनच भाजपचा झेंडा फडकवत ठेवला आहे. परंतु त्यांची ताकद कमी पडत होती. आता मात्र केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आल्याने त्यांची ताकद वाढली आहे. स्थानिक पातळीवरही पदांची खैरात करून भाजपने राष्ट्रवादीपुढे आव्हान निर्माण केले आहे. यासाठी खोत यांची अंतर्गत ताकदही मिळत आहे.
राष्ट्रवादीविरोधात भाजपची मोर्चेबांधणी सुरू असताना, दुसरीकडे मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी तिसºयांदा खासदार होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी वाळवा व शिराळा तालुक्यात राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आहे. याचा श्रीगणेशा त्यांनी आष्टा येथून केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात काँग्रेस आघाडीचा पाठिंबा घेऊन खासदार राजू शेट्टी रिंगणात उतरतील, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.