.................................................
पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण
लोकमत न्यूज नेटवर्क
दहिवडी : सातारा - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे. सातारा-पंढरपूर मार्ग जिल्ह्यातील कोरेगाव, पुसेगाव, निढळ, गोंदवले, म्हसवडवरून जातो. या मार्गाच्या बाजूला तीन वर्षांपूर्वी काही प्रमाणात झाडे होती. पण, महामार्गाच्या कामाच्या वेळी अनेक झाडे पाडण्यात आली. त्यामुळे सध्या रस्त्याच्या बाजूला अपवादात्मकच झाडे दिसतात. पर्यावरण संतुलनासाठी या महामार्गाच्या बाजूला वृक्षारोपण करून संवर्धन करावे, अशी मागणी होत आहे.
....................................................
साताऱ्यात प्लास्टिक
पिशवीतून फळे
सातारा : सातारा शहरातील काही भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने प्लास्टिक पिशवीवर बंदी घातली आहे. सुरुवातीच्या काळात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पण, त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आजही साताऱ्यातील काही फळ विक्रेते प्लास्टिक पिशवीतून फळे देताना दिसून येत आहे.
.........................................................
मेथीची पेंडी महागली
सातारा : सातारा शहरात पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. मेथीची पेंडी तर १५ ते २० रुपयांवर गेली आहे. सातारा बाजार समितीतून पालेभाज्यांची खरेदी करण्यात येते. त्यानंतर भाज्या मंडईत विक्रीसाठी ठेवण्यात येतात. सध्या मेथी तसेच कोथिंबीर पेंडीचा दर वाढला आहे. मेथी २० तर कोथिंबीर पेंडी १० रुपयांपुढे मिळत आहे.
........................................
माण तालुक्यात पावसाची दडी
दहिवडी : माण तालुक्यात मागील तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण, अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
...................................................
पाझर तलाव कोरडे
वरकुटे मलवडी : माण तालुक्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे बहुतांशी पाझर तलाव कोरडे आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात पाऊस होतो. मान्सूनचाही पाऊस होतो. पण, या वर्षी पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे पाझर तलाव कोरडे आहेत.
.....................................................................