नागठाणे : कोरोना महामारीचे राजकारण न करता सर्व देशांना एकमेकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे, असे उद्गार आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील प्रा. सुनील गायकवाड यांनी काढले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित आर्टस ॲण्ड काॅमर्स काॅलेज नागठाणे या महाविद्यालयातील अग्रणी महाविद्यालय योजनांतर्गत राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित 'कोरोना आणि आंतरराष्ट्रीय राजकारण' या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
गायकवाड म्हणाले, जग जरी कोरोना महामारीला सामोरे जात असले तरी सध्या जगात आढळून येणाऱ्या असमानतेला केवळ कोरोना जबाबदार नाही. हे समजून घेण्यासाठी कोरोनापूर्व, कोरोना वर्तमान आणि कोरोनापश्चात अशी विभागणी करुन परिस्थितीकडे डोळसपणे पहावे लागेल. तसेच जगात कोणत्याही घटना, प्रसंग व समस्या इत्यादी बाबींचे वस्तुस्थितीदर्शक पुरावे असतील तर त्याचे राजकारण न करता ते स्वीकारता आले पाहिजे. येणाऱ्या काळात महामारीची व इतर बाबींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल.
प्राचार्य डाॅ. जे. एस. पाटील म्हणाले, जगातील अनेक देशांनी कोरोना महामारीमध्ये कोणतेही राजकारण न करता आपली गरज ओळखून त्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे.
याप्रसंगी 'कोरोना आणि आंतराष्ट्रीय राजकारण' यासंदर्भात विद्यार्थी व प्राध्यापकांच्या अनेक प्रश्न व शंकांचे निरसन केले.
राज्यशास्र विभाग प्रमुख प्रा. एन. एम. चोबे यांनी प्रास्तविक केले. तर प्रा. भालचंद्र बिचितकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सागर चव्हाण यांनी आभार मानले. हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने झाला. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ॲानलाईन सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डाॅ. अजितकुमार जाधव व इतर सदस्यांनी केले. तांत्रिक सहाय्य प्रा. स्नेहल वरेकर यांनी केले.