वडूज : ‘विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे. लोकांची मागणी व निधीची उपलब्धता याचा ताळमेळ घालून विकासकामे होत असतात. मात्र भौतिक विकास होत असताना गावोगावचे कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेमध्ये समन्वय राहणे ही काळाची गरज आहे,’ असे मत नियोजन समितीचे सदस्य अशोकराव गोडसे यांनी व्यक्त केले.
येथील पंचायत समिती सभागृहात गोडसे यांच्यासह विसापूरचे माजी सरपंच, राष्ट्रवादीचे नेते सागरभाऊ साळुंखे यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी, तर वडूजचे माजी सरपंच अनिल गोडसे यांची पुणे विभाग शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल येरळवाडी येथील लोकेशन ग्रुप व धनंजय चव्हाण मित्रमंडळाच्यावतीने सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी सहायक गटविकास अधिकारी भरत चौगुले, पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण, माजी उपसभापती संतोष साळुंखे, ृॅड. रोहन जाधव, डॉ. संतोष देशमुख, विनायक ठिगळे, अॅड. किसन खामकर, शिवाजी साबळे, संतोष दुबळे, शारदा भस्मे, शबाना मुल्ला, राणी शिंदे, सुरेखा शिंदे उपस्थित होत्या.
गोडसे म्हणाले, ‘जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार होणे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. पदाच्या माध्यमातून भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.’
सागर साळुंखे म्हणाले, ‘प्रस्थापितांविरोधात मोठा संघर्ष करत सर्वसामान्यांची कामे केल्यामुळेच आपणाला इथपर्यंत पोहोचता आले. पदाच्या माध्यमातून चव्हाण मित्रमंडळ व लोकेशन ग्रुपला चांगले पाठबळ दिले जाईल.’
यावेळी अनिल गोडसे, संतोष साळुंखे, चौगुले यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास वरुडचे माजी सरपंच लालासाहेब माने, सोमनाथ साठे, प्रा. दिलीप भुजबळ, मोहन बागल, बाळू इनामदार, बाळासाहेब जगदाळे, गणपतराव खाडे, योगिता काळे उपस्थित होते. धनाजी शिवाजी चव्हाण यांनी स्वागत केले. धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. आयाज मुल्ला यांनी आभार मानले.