खंडाळा : किसन वीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर नुकतेच भाजपमध्ये गेले. त्यानंतर याच कारखान्याच्या एका सोहळ्यात बोलताना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात मदनदादांची नितांत गरज आहे,’ अशी साखर पेरणी केल्यामुळे नव्या अध्यायाची नांदी वाई विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांना स्पष्टपणे जाणवली. निमित्त होते खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या गळित हंगामात उत्पादित झालेल्या १ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याच्या पूजन सोहळ्याचे. किसन वीर साखर कारखान्याने उभारणी करून चालविण्यास घेतलेल्या खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या गळित हंगामात उत्पादित झालेल्या १ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन देशमुख व त्यांच्या पत्नी स्मिताताई देशमुख या उभयतांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. किसन वीर उद्योग समूहाचे प्रमुख मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, डॉ. नीलिमा भोसले, ज्ञानदीप पतसंस्थेचे अध्यक्ष जिजाबा पवार, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, केतन भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजीराव पवार, पुरुषोत्तम जाधव, अनुप सूर्यवंशी, विजय काटवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.देशमुख म्हणाले, ‘मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर उद्योग समूहाला भेट देण्याचा मोह झाला. राज्य शासनाच्या मदतीशिवाय सहकारातील खंडाळा साखर कारखाना कसा उभा राहिला. याचीही उत्सुकता होती. भागिदारीतून त्यांनी हा साखर कारखाना उभारल्याची माहिती मिळाली. अशा विधायक रचनात्मक नेतृत्वाच्या पाठीशी शेतकऱ्यांनीही उभे राहिले पाहिजे. भविष्यात किसन वीर कारखान्याला नक्की भेट देणार.’ मदन भोसले म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले, शंकरराव गाढवे व तत्कालीन सहकाऱ्यांनी खंडाळा तालुक्यात कारखान्याचे पाहिलेले स्वप्न त्यांच्या पुढच्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून पूर्ण करताना आनंद होत आहे. दोन सहकारी साखर कारखान्यांनी एकत्र येऊन नवा कारखाना उभा करणे ही देश पातळीवरील पहिली घटना आहे. या साखर कारखान्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन होणार असून, शेतकऱ्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले आहे. खंडाळा तालुक्यात आलेल्या सेझमध्ये स्थानिकांना स्थान मिळालेले नाही. मात्र, स्थानिक लोकांच्या या साखर कारखान्यामुळे तालुक्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल.’गजानन बाबर म्हणाले, ‘खंडाळा साखर कारखान्यात साखरेबरोबर वीजनिर्मितीही होते. मात्र, अजूनही सरकारकडून वीज खरेदी करार झालेला नाही. त्याचबरोबर कारखान्याचा गळित हंगाम संपत आला तरीही शासनाने अद्याप पाणी परवाना दिलेला नाही. वीज खरेदी करार व पाणी परवान्यासाठी सहकार मंत्री या नात्याने आपण मदत करावी.’ शंकरराव गाढवे व डॉ. नीलिमा भोसले यांनी सुभाषराव देशमुख व स्मिताताई देशमुख यांचा किसन वीर कारखाना स्थळावर आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे सभासद, मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) सहकारात कामासाठी मदन भोसले यांची गरजराज्यातील जे सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, सहकारी संस्था डबघाईला आल्या आहेत, बंद पडल्या आहेत. त्या पुन्हा उभे करण्यासाठी मदन भोसले यांच्यासारख्या सहकार धुरिणांची गरज पडेल. शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात सर्वत्र पाण्याची पातळी वाढलेली आहे. शेतकरी व साखर कारखानदारांनी भविष्यात पाण्याचे नियोजन ठिबक पद्धतीने करण्याची गरज आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी माती व पाणी परीक्षणालाही महत्त्व दिले पाहिजे. सहकारातून महाराष्ट्र समृद्ध करण्याची राज्य सरकाराची भूमिका आहे, त्यासाठी गाव पातळीवरील सोसायट्या, दूध संघ, साखर कारखाने, सूतगिरण्या समृद्ध झाल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असून, शहरांकडे जाणारा तरुणांचा ओघ थांबविण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून गावातच रोजगार निर्मिती होण्याची गरजही सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली.
राज्याच्या सहकारात मदनदादांची गरज : देशमुख
By admin | Published: January 20, 2017 10:32 PM