सातारा : फेब्रुवारी महिना सुरू असल्याने लवकरच पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर येऊ शकते. त्यामुळे आतापासूनच पाण्याची बचत केल्यास निश्चित पाणीटंचाईचे सावट कमी जाणवणार आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
०००००००
पुलाखाली गाड्या
सातारा : सातारा-कोरेगाव मार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील पुलाखाली गेल्या काही दिवसांपासून बेवारस स्थितीत दुचाकी गाड्या उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे मोठी जागा वाया जात असून गैरप्रकारही घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुलाखाली गाड्या उभ्या करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
००००
सीसीटीव्हीची गरज
सातारा : साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकातील प्रतीक्षालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. मात्र एकाच वेळी दोन-तीन लाईनमध्ये गाड्या लावलेल्या असतात. त्यामुळे अनेक भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत नाहीत. त्यामुळे कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
००००
मास्कला मागणी
सातारा : जिल्ह्यात आता पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू झाले आहेत. शाळेत मुलांची गर्दी वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे मुलांना दप्तरासोबत पाण्याची बॉटल तसेच सॅनिटायझर दिले जात आहे. त्याचप्रमाणे मास्क घेतले जात आहेत. त्यामुळे मागणी वाढत आहे.
०००००००
कचरा उघड्यावर
पाचगणी : वाई-पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा उघड्यावर आणून टाकत असतात. काही जनावरे तेथेच कचऱ्यात खाद्यपदार्थ शोधत असतात. जैविक कचरा जनावरांच्या खाण्यात आला तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
०००००
गीतांजली जगदाळे हिची निवड
सातारा : कृष्णानगर येथील सातारा जिल्हा बालविकास समिती संचलित गोकुळ प्राथमिक शाळेतील सहावीतील विद्यार्थिनी गीतांजली संजय जगदाळे हिची डाॅ. होमी भाभा बाल वैज्ञानिक प्रॅक्टिकल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशाबद्दल सागर प्रभाळे, विनोद कुलकर्णी, मुख्याध्यापिका अनघा कारखानीस, वर्गशिक्षिकांनी कौतुक केले आहे.
०००००००
धोका कमी
सातारा : साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरमध्ये कोल्हापूरकडून येणारी वाहने आणि नगरपालिकडेकडून येणारी वाहने एकत्र मिळतात. त्या ठिकाणी अनेक वाहने नो एन्ट्रीमध्ये जात होती. त्यामुळे अपघातांचा धोका होता. त्याठिकाणी अडथळे उभे केल्याने अपघातांचा धोका कमी झाला आहे.
०००००००००
उन्हाची तीव्रता कमी
सातारा : साताऱ्यासह परिसरात काही दिवसांपूर्वी थंडीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे सातारकर लवकरच घरात जात होते. मात्र आता दोन दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे उकाडा जाणवत आहे. मात्र सायंकाळी पश्चिमेकडून मोठ्या प्रमाण गार वारेही वाहत असल्याने दिलासा मिळत आहे.
०००००००००
विदयालयास मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
पेट्री : सातारा-कास मार्गावरील पेटेश्वर शिक्षण संस्थेचे आदर्श माध्यमिक विद्यालय पेटेश्वरनगर पो. पेट्री, ता. सातारा यांना श्रीमती इन्दुमती वसंतलाल शाह चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि घणसोली बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना वह्या, लेखनपॅड, स्केचपेन, मास्क, कंपाॅस पेटी साहित्य, खाऊ आदी साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय बिरामणे याच्या हस्ते वाटप करण्यात आले. सोमनाथ जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तसेच एल. डी. गोगावले यांनी आभार मानले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.
०००००००००
उसाचे नुकसान
सातारा : जिल्ह्यातील सर्वच सहकारी साखर कारखाने पूर्ण क्षमतेने ऊस गळीत करत आहेत. मात्र अनेक ठिकाणी वीज वाहक तारांमधून ठिणग्या पडल्यामुळे उसाने पेट घेण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
००००००००
मोफत नेत्र तपासणी
सातारा : शाहू कला अकादमी संचलित श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय संचलित कोडोली यांच्यावतीने सोमवार, दि. १५ रोजी जिल्हा परिषद कॉलनी, शाहूपुरी, सातारा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
००००००००
सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव
सातारा : कोरोना काळात जिल्ह्यातील सर्व पालिकांमधील सफाई कामगारांकडून जीव धोक्यात घालून हद्दीत जास्तीत जास्त स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न केला जात होता. त्यांच्यामुळे मोठा धोका कमी झाला. यामुळे सामाजिक संस्था, संघटनांच्यावतीने साताऱ्यात सफाई कामगारांचा गौरव करण्यात येणार आहे. या सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.