ढेबेवाडी
: ढेबेवाडी येथील ३६ ऑक्सिजन बेडसह उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची चणचण भासू लागल्याने गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी नातेवाइकांना वणवण करावी लागत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयातच कोविड रुग्णालय उभारल्याने नियमित रुग्णांची मात्र उपचाराविनाच तडफड होत आहे. तर, कोविड हॉस्पिटलसाठी तज्ज्ञ डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने कोविड रुग्णांवर उपचारासाठी दंतचिकित्सक डॉक्टरांची नेमणूक करण्याची नामुश्की आरोग्य विभागावर आली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागासह सर्वच स्तरांतून प्रयत्न होऊ लागले आहेत. रुग्णांची संख्या घटल्याने गतवर्षी चालू केलेले कोविड हॉस्पिटल मध्यंतरी बंद करण्यात आले होते. मात्र, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनासह आरोग्य विभागाची झोपच उडाली. प्रशासनही खडबडून जागे झाले. रुग्णसंख्या एवढ्या झपाट्याने वाढू लागल्याने आणि अपुऱ्या सोयीसुविधांंमुळे कोरोनाला रोखणे हाताबाहेर गेले आहे. यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा बंद केलेले कोरोना हॉस्पिटल पूर्ण ताकदीने उभे करण्याचा निर्णय घेतला.
ढेबेवाडी येथील कोविड रुग्णालय सप्टेंबर २०२० मध्ये गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या प्रयत्नाने चालू करण्यात आले होते. गतवर्षी हे रुग्णालय केवळ ढेबेवाडी विभागापुरतेच नाही, तर पाटण तालुक्यातील रुग्णांसाठी वरदान ठरले होते. हेच कोविड रुग्णालय दोन दिवसांपूर्वी पूर्ववत करण्यात आले. ३६ बेडची क्षमता असलेल्या या रुग्णालयात दोन दिवसांत आठ कोविड रुग्ण दाखलही झाले. तर, सोमवारी दाखल होण्यासाठी आलेल्या एका रुग्णाचा दाखल होण्यापूर्वीच रुग्णालयाच्या दारात मृत्यू झाला.
पाटण तालुक्यातील या दुर्गम विभागात उभारण्यात आलेल्या या कोविड हॉस्पिटलमध्ये ३६ बेडची क्षमता असली, तरी तज्ज्ञ डॉक्टरांची मात्र वानवा जाणवत आहे. कोविडचा एखादा गंभीर रुग्ण येथे दाखल झालाच, तर येथे ना व्हेंटिलेटर ना तज्ज्ञ डॉक्टर, यामुळे येथे कार्यरत असलेल्या नवख्या डॉक्टरांकडून संबंधित रुग्णांंच्या नातेवाइकांना कराडचा रस्ता दाखवला जातो.
चौकट...
साहेब लक्ष घालाच... मंत्रीमहोदयांना साकडे...
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या प्रयत्नाने सप्टेंबर २०२० मध्ये चालू केलेल्या या हॉस्पिटलमुळे पहिल्या कोरोना लाटेत अनेक रुग्णांना जीवदान मिळाले. मात्र, आता येथे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने साहेब लक्ष घालाच, असे साकडे विभागातील जनतेने घातले आहे.